बार मॅनेजरला धमकी, चिचगड पोलिसात तक्रार दाखल

देवरी: तालुक्यातील उचेपूर ग्रामपंचायत हद्दीत येत असलेल्या ग्राम धोबाटोला येथील मे.अरमान रेस्टॉरंट अँड बार येथील मॅनेजरला दोन इसमांनी धमकाविल्याने त्या इसमाविरोधात दि.२७ मार्च २०२६ ला चिचगड पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बारचा वाद वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, ग्राम धोबाटोला हद्दीत निलेश शाहू रा. गणूटोला यांच्या मालकीचे मे.अरमान रेस्टॉरंट अँड बार आहे, मागील तीन ते चार महिन्यापासून बार बंदच्या विरोधात गावकऱ्यांनी आंदोलन केले होते. त्यामुळे जिल्हाधिकारी गोंदिया यांनी उभी बाटली आणि आडवी बाटली पद्धतीने निवडणुक घेतली मात्र घेतलेल्या निवडणुकीत बार चालू राहण्यासमर्थनात अधिक मतदान झाले. तरीही नागरिकांचा रोष कमी होतांना दिसत नसून बारच्या साहित्याची तोडफोड करून निषेध व्यक्त केला जात आहे.
दिनांक २७ मार्च २०२६ रोजी बारचे मॅनेजर कुणाल हलामी हे आपल्या सहकार्यासोबत बार सुरू करून समोरील छपरीमध्ये बसले असतांना सकाळी ११:०० वाजे दरम्यान रस्त्याने एक चारचाकी टाटा सुमो गाडी येऊन बार समोर थांबली. गाडीतील काही इसमानी बार समोर बसलेल्या बार मॅनेजरला गाडीजवळ बोलविले. तेव्हा मॅनेजरने पाहिले असता टाटा सुमो येथे अक्षय सर्पा (वय २६) तसेच उमेश (वय ३८) दोन्ही रा. धोबीटोला बसले होते. त्यात उमेश नामक इसमाने “बार कोणाच्या परवानगीने सुरू केलास? तसेच आम्ही समोरून येत आहो, तेव्हापर्यंत तू बार बंद कर, आमच्या येईपर्यंत जर बार सुरू दिसला तर, बारची तोडफोड आणि बार मध्ये काम करणाऱ्यांना मारपीट करण्यात येईल अशी धमकी दिली. त्यामुळे बार मॅनेजर कुणाल हलामी यांनी लगेच चिचगड पोलीस ठाणे गाठून धमकी देणाऱ्या इसमाविरोधात तक्रार दाखल केली.

” परिसरात या मार्गावर बारसह अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावर देशी दारूचे दुकान सुरू आहे. काही सुज्ञ नागरिकांनी बारचा विरोध दर्शविला मात्र जिल्हाधिकाऱ्याकडून निर्णयासाठी मतदान घेतले त्यावेळी अनेकांनी बारच्या समर्थनार्थ मतदान केलं तर दुसरीकडे याच मार्गावर अवघ्या थोड्या अंतरावर देशी दारूचे दुकान सुरू आहे त्याला मात्र कुठलेही विरोध नाही. त्यामुळे बारला होणारा विरोध हा हेतूपरस्पर तर नाही ना असा सवाल उपस्थित होत आहे.”

“फिर्यादीच्या तक्रारीनुसार दखलपात्र गुन्हा दाखल केला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.” हेगडकर ठाणेदार चिचगड

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें