देवरी (जि. गोंदिया) : समग्र शिक्षा अभियानांतर्गत राज्यातील अनेक शाळा व बीआरसी केंद्रांमध्ये संगणक प्रयोगशाळांची उभारणी करण्यात आली असून, देवरी तालुक्यातील बीआरसी देवरी येथेही आधुनिक आयसीटी लॅबच्या माध्यमातून संगणक शिक्षणाचे प्रभावी धडे दिले जात आहेत.या उपक्रमामुळे येथील कर्मचारी केवळ कागदी कामापुरते मर्यादित न राहता संगणक, प्रोजेक्टर व इंटरनेटचा वापर करून विविध विषय अधिक आकर्षक, सोप्या व समजण्यास सुलभ पद्धतीने शिकत आहेत. डिजिटल लॅबमुळे कर्मचाऱ्यांमध्ये कार्याची आवड वाढली असून, त्यांचा आत्मविश्वासही उंचावला आहे.
आजच्या तांत्रिक युगात प्रत्येक क्षेत्रात ऑनलाईन प्रणाली आणि संगणकाचे महत्त्व वाढले आहे. अशा परिस्थितीत संगणक हाताळण्याचे कौशल्य आवश्यक ठरत आहे. आयसीटी लॅबमुळे ग्रामीण भागातील व्यक्तींना संगणक वापरण्याची सवय लागून त्यांची डिजिटल कौशल्ये विकसित होत आहेत.या महत्त्वाकांक्षी उपक्रमात आयसीटी शिक्षिका कु. एस. डी. कोराम यांचे विशेष योगदान असून, त्यांनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. तसेच शिक्षणाधिकारी (प्राथमिक) विशाल डोंगरे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुधीर महामुनी, उपशिक्षणाधिकारी/गट शिक्षणाधिकारी देवरी महेंद्र मोटघरे आणि जिल्हा प्रकल्प समन्वयक (आयसीटी) सुभाष चौरागडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीपणे राबविला जात आहे.








