♦️देवरी पोलीस स्टेशन व ब्लॉसम पब्लिक स्कूलचा संयुक्त उपक्रम
देवरी : देवरी पोलीस स्टेशन व ब्लॉसम पब्लिक स्कूल देवरी यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस रेझिंग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी विशेष शस्त्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. प्रदर्शनाच्या माध्यमातून पोलीस दलाच्या कार्यपद्धतीची, शिस्तीची व देशसेवेची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
कार्यक्रमाचे मार्गदर्शन पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे यांनी केले. त्यांनी पोलीस दलाची स्थापना, जबाबदाऱ्या तसेच समाजातील शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी पोलिसांचे योगदान याबाबत सविस्तर माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक गीता मुळे यांनी शस्त्रांच्या सुरक्षित वापराविषयी व कायद्याचे पालन करण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. वाहतूक पोलीस अंमलदार सिद्धार्थ तागडे, पोलीस कर्मचारी वरखडे, लता राजभोज, चौधरी यांनी सहकार्य केले.
या वेळी ब्लॉसम पब्लिक स्कूलचे प्राचार्य डॉ. सुजित टेटे यांनी उपस्थितांचे स्वागत करून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना पोलीस दलाच्या कार्याबद्दल प्रत्यक्ष माहिती मिळाल्याने त्यांच्यात उत्सुकता व आदरभाव निर्माण झाला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस कर्मचारी, शिक्षकवृंद नितेश लाडे , सरिता थोटे, वैशाली मोहुर्ले व विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.









