शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आदिवासी), देवरी येथे वीर बाल दिवस उत्साहात साजरा

देवरी, दि. २६ — शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आदिवासी), देवरी येथे आज ‘वीर बाल दिवस’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सिखांचे दहावे गुरु श्री गुरु गोविंद सिंह महाराज यांचे साहिबजादे बाबा जोरावर सिंह व बाबा फतेह सिंह यांच्या अद्वितीय शौर्य व बलिदानाला यावेळी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

कार्यक्रमास व्यासपीठावर प्राचार्य विजय कावळे , कुलदीप लांजेवार अध्यक्ष दीनबंधू संस्था, प्राचार्य डॉ. सुजित टेटे ब्लॉसम पब्लिक स्कूल देवरी , उपस्थित अधिकारीवर्ग, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात वक्त्यांनी साहिबजाद्यांच्या धैर्य, श्रद्धा व देशनिष्ठेचा उल्लेख करत विद्यार्थ्यांना त्यांच्या आदर्शांवर चालण्याचे आवाहन केले. अत्यंत लहान वयात अन्याय व अत्याचारापुढे न झुकता त्यांनी दाखवलेले धैर्य आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगण्यात आले.

यावेळी बाल वीर पुरस्काराने दक्ष गवते, हर्षल रक्षा , प्रेरणा ठाकरे , आस्था नरुती यांचा सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांना उद्देशून बोलताना, कौशल्य शिक्षणासोबतच चारित्र्य, शिस्त, राष्ट्रभक्ती व सामाजिक जबाबदारी या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. उद्याच्या औद्योगिक, तांत्रिक व आर्थिक प्रगतीत विद्यार्थ्यांची भूमिका मोलाची राहील, असेही नमूद करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शिक्षकवृंद, कर्मचारी व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. शेवटी, साहिबजाद्यांच्या बलिदानाला नमन करून त्यांच्या आदर्शांवर चालण्याची सामूहिक प्रतिज्ञा घेण्यात आली.कार्यक्रमाची सांगता ‘जय हिंद! जय भारत!’ या घोषणांनी झाली.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें