देवरी: तालुक्यातील ओवारा गावालगतच्या शेतामध्ये पिकांचे संरक्षण करण्याच्या नावाखाली काही शेतकऱ्याने हिंस्र प्राण्यांचे (वाघ , बिबट्या, हत्ती आणि रानटी प्राणी ) रेकॉर्ड केलेले आवाज मोठ्या आवाजात ध्वनी यंत्राद्वारे लावल्यामुळे ओवारा येथील ग्रामवासी प्रचंड त्रस्त झाले आहेत. सदर परिसरात यापूर्वीही वाघ व बिबट्याचे अस्तित्व आढळून आले असून, अशा परिस्थितीत हे आवाज ऐकून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशेषतः रात्रीच्या वेळी सतत सुरू असलेल्या या आवाजांमुळे महिला, वृद्ध व लहान मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून, भीती, मानसिक तणाव, झोप न लागणे, डोकेदुखी अशा समस्या उद्भवत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. बिबट्याच्या भीतीसह अशा रेकॉर्ड आवाजांमुळे नागरिकांना असह्य त्रास सहन करावा लागत आहे.
महत्त्वाचे म्हणजे, सदर ध्वनी यंत्र कुणाच्या परवानगीने बसविण्यात आले, याबाबतही ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केला आहे. वनविभागाची कोणतीही लेखी परवानगी नसताना अशा प्रकारचे ध्वनी यंत्र बसविणे हे नियमबाह्य असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
या प्रकरणी वनविभागाने त्वरित हस्तक्षेप करून संबंधित शेतकऱ्यावर कारवाई करावी, तसेच गावकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने तातडीने हे ध्वनी यंत्र हटवावे, अशी ठाम मागणी ओवारा ग्रामस्थांनी केली आहे. प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.









