देवरी: ग्राम पंचायत लोहारा येथे गावातील सर्व ग्रामस्थ, युवक-युवती, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, खेळाडू तसेच पोलिस, आर्मी व इतर सेवांमध्ये जाणाऱ्या तरुणांसाठी खेळाचे मैदान, व्यायामशाळा व क्रीडा संकुल उपलब्ध करून देण्यात यावे, या मागणीसाठी ग्राम पंचायत प्रशासनास निवेदन देण्यात आले.
सदर निवेदनात गावातील नागरिकांच्या आरोग्यविषयक गरजा, क्रीडा कौशल्य विकास तसेच तरुणांना शारीरिक तंदुरुस्ती व स्पर्धात्मक तयारीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. खेळाचे मैदान व क्रीडा संकुल उभारल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व खेळाडूंना प्रोत्साहन मिळून त्यांचे भविष्य घडण्यास मदत होईल, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
या प्रसंगी सरपंच पन्नालाल चौधरी व उपसरपंच सुखराम अगळे उपस्थित होते. त्यांनी ग्रामस्थांच्या मागणीस सकारात्मक प्रतिसाद देत सदर विषय शासनस्तरावर मांडून आवश्यक पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. ग्रामस्थांच्या एकत्रित प्रयत्नातून गावात क्रीडा व आरोग्य सुविधांचा विकास होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.









