देवरी : महायुती सरकारने तीन-चार दिवसांपूर्वी राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३२६२ कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी निकष जाहीर केले आहेत. पूर्णतः अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांच्या यादीत जिल्ह्यातील देवरी तालुक्याचा समावेश असून, उर्वरित सात तालुक्यांचा समावेश अंशतः बाधित तालुक्यांमध्ये आहे. जिल्हा प्रशासनाकडून नुकसानाचा अंतिम अहवाल सादर झाल्यानंतर शेतकऱ्यांना पात्र नुकसानभरपाई वितरित केली जाणार आहे.
शासनाने जाहीर केलेल्या अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांच्या यादीत गोंदिया, सालेकसा, गोरेगाव, सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव, तिरोडा, आमगाव या सात तालुक्यांचा अंशतः बाधित म्हणून समावेश आहे. देवरी तालुका पूर्णतः बाधित आहे. जिल्ह्यात २५ ते २८ सप्टेंबर दरम्यान झालेली अतिवृष्टी, परतीच्या पावसामुळे खरिपातील धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानाचे कृषी आणि महसूल विभागाच्या माध्यमातून पंचनामे करण्यात आले होते. त्यात प्राथमिक सात सर्वेक्षणात जिल्ह्यातील तालुक्यांतील ९१ गावांतील ४७०.४० हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले होते. यामुळे ८७६ शेतकरी बाधित झाले आहेत. यात सर्वाधिक पिकांचे नुकसान हे देवरी तालुक्यात झाले आहे. जिल्हा प्रशासनाकडून नुकसानाचा अंतिम अहवाल जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाईसाठी निधी जाहीर केला जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे नेमकी किती मदत जाहीर होते, याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.








