साहेब ‘आनंदाचा शिधा’ मिळेल का ? शासनाला पडला शिधा वितरणाचा विसर

गोंदिया : सणवारात रेशन लाभार्थीना गोडधोड खाता यावे, यासाठी भाजपा व शिंदेसेनेने मागील वर्षी ‘आनंदाचा शिधा’ रेशनमधून उपलब्ध करून दिला होता. पाच खाद्य वस्तू असलेला हा शिधा केवळ १०० रुपयांत दिला जात होता. यंदा मात्र राज्य शासनाला ‘आनंदाचा शिधा’चा विसर पडला असून, मागील गौरी- गणपतीनंतर आतापर्यंत ‘आनंदाचा शिधा’ देण्यात आलेला नाही. दिवाळी आता जेमतेम ५ दिवसांवर आली असूनही ‘आनंदाचा शिधा’चे साधे नावही शासनाकडून घेतले गेले नसल्याचे दिसते.

महागाईने सर्वांचेच कंबरडे मोडून काढले आहे. अशात मध्यमवर्गीय कसेबसे आपली गुजराण करत असून, सणवारात काहीतरी गोडधोड तयार करून सण साजरा करून घेतात. मात्र, त्यापेक्षा खालच्या गटाला दोनवेळचे जेवणही कठीण जाते अशी स्थिती आहे. अशात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी अंत्योदय व प्राधान्य कुटुंब रेशनकार्डधारकांना सणवारात तोंड गोड करण्यासाठी ‘आनंदाचा शिधा’ रेशनमधून उपलब्ध करून दिला होता.

जिल्ह्यात २.५९ लाख कार्डधारक

मागील वर्षी शासनाकडून गौरी-गणपतीमध्ये ‘आनंदाचा शिधा’ वितरित करण्यात आला होता. तेव्हा सुमारे दोन लाख ४६ हजार ९३६ शिधा जिल्ह्याला प्राप्त झाला होता. यंदा मात्र शासनाकडून आतापर्यंत ‘आनंदाचा शिधा’ची घोषणा करण्यात आलेली नाही. यंदा जिल्ह्यात ८३ हजार २८३ अंत्योदय रेशनकार्डधारक असून, त्यात तीन लाख ४६ हजार ९६३ लाभार्थी आहेत. तर एक लाख ७६ हजार ४२६ प्राधान्य कुटुंब कार्डधारक असून, त्यात सात लाख ६५ हजार ३९५ लाभार्थी आहेत. अशाप्रकारे एकूण दोन लाख ५९ हजार ७०९ कार्डधारक व ११ लाख १२ हजार ३५८ लाभार्थी ‘आनंदाचा शिधा’पासून वंचित राहणार आहेत.

पाच जिन्नस असलेला हा शिधा अंत्योदय व प्राधान्य कुटुंब कार्डधारकांना रेशनच्या माध्यमातून गौरी-गणपती, रामनवमी, दिवाळी आदी सणवारांत दिला जात होता.मात्र यंदा शासनाला ‘आनंदाचा शिधा’चा विसर पडल्याचे दिसत आहे.

मागील वर्षी गौरी-गणपतीमध्ये ‘आनंदाचा शिधा’ देण्यात आल्यानंतर यंदा गौरी- गणपतीतही देण्यात आला नाही. म्हणजेच, वर्ष लोटूनही शासनाकडून ‘आनंदाचा शिधा’ देण्यात आलेला नाही.विशेष म्हणजे, दिवाळी आता जेमतेम ५ दिवसांवर आली असून, शासनाकडून अद्यापही ‘आनंदाचा शिधा’ची घोषणा करण्यात आलेली नाही. अशात ‘आनंदाचा शिधा’ची वाट बघत बसलेल्या लाभार्थीच्या घरात यंदाची दिवाळी गोडधोडविनाच राहणार असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें