गोंदिया: महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही वार्षिक सारस पक्षी गणनेचे आयोजन करण्यात आले असून ही गणना शनिवार, दि. 20 जून 2026 रोजी पार पडणार आहे. महाराष्ट्रात सारस पक्ष्यांचे वास्तव्य प्रामुख्याने गोंदिया व भंडारा जिल्ह्यांमध्ये आढळते. तसेच मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातही सारस पक्ष्यांची उल्लेखनीय संख्या असून या तिन्ही जिल्ह्यांमध्ये दरवर्षी समन्वयाने सारस गणना केली जाते.
या उपक्रमांतर्गत दि. 19 जून रोजी बालाघाट जिल्ह्यात तर दि. 20 जून रोजी गोंदिया जिल्ह्यात सारस पक्ष्यांची गणना करण्यात येणार आहे. ही गणना सेवा संस्था, गोंदिया वनविभाग, बालाघाट वनमंडल, स्थानिक सारस मित्र, स्वयंसेवी कार्यकर्ते तसेच शेतकरी यांच्या संयुक्त सहभागातून पार पडणार आहे.
सारस पक्षी गणनेद्वारे त्यांच्या अचूक संख्येची नोंद, अधिवासांचे निरीक्षण, प्रजनन क्षेत्रांची माहिती तसेच संरक्षणासाठी आवश्यक बाबींचा अभ्यास केला जातो. या माहितीच्या आधारे सारस संवर्धनासाठी प्रभावी कार्ययोजना आखण्यास मदत मिळते.
गोंदिया जिल्ह्यातील गणना गोंदिया वनविभागाचे उपवनसंरक्षक पवनकुमार जोंग, सेवा संस्थेचे अध्यक्ष सावन बहेकार, सेवा संस्थेची टीम, वनविभागाचे अधिकारी-कर्मचारी तसेच स्थानिक सारस मित्र यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहे.
सारस पक्ष्यांच्या संरक्षणासाठी लोकसहभाग वाढविणे, त्यांच्या नैसर्गिक अधिवासांचे संवर्धन करणे आणि वैज्ञानिक माहिती संकलित करणे हा या वार्षिक गणनेचा प्रमुख उद्देश आहे. या उपक्रमामुळे सारस संवर्धनाला बळ मिळत असून स्थानिक नागरिकांमध्ये वन्यजीव संरक्षणाबाबत जनजागृती निर्माण होत आहे.







