10 हजाराची लाच, महसूल सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात

गोंदिया तहसील कार्यालयात 10 हजार रुपयांच्या लाचेची मागणी, पहिला हप्ता स्वीकारताना रंगेहात अटक

गोंदिया : गोंदिया तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक शालू कमलेश कावळे (वय ३८) यांना १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी रंगेहात पकडले. एसीबीकडून प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार हे भारतीय नौदलाचे माजी सैनिक तसेच पोलीस विभागातून सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक आहेत. शासनाकडून माजी सैनिक म्हणून मिळणारी सिलिंगची जमीन त्यांच्या नावावर करून देण्यासाठी त्यांनी तहसीलदार, गोंदिया यांच्याकडे अर्ज केला होता.

सदर अर्जावरील कार्यवाही करून देण्यासाठी महसूल सहाय्यक शालू कावळे यांनी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार १६ जून रोजी एसीबी कार्यालय, गोंदिया येथे प्राप्त झाली होती. पडताळणीदरम्यान संबंधित कर्मचाऱ्यांनी ५० हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यापैकी १० हजार रुपये आगाऊ आणि उर्वरित ४० हजार रुपये काम पूर्ण झाल्यानंतर देण्याचे ठरल्याचे एसीबीने सांगितले. यानंतर एसीबीने १७ जून रोजी सापळा कारवाई राबविली. या कारवाईत शालू कावळे यांना तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. आरोपीच्या अंगझडतीत लाचेची रक्कम जप्त करण्यात आली. तसेच आरोपीच्या ताब्यातील व्हिवो कंपनीचा मोबाईल फोनही जप्त करण्यात आला आहे.

आरोपीच्या निवासस्थानी घरझडतीची प्रक्रिया सुरू असून गोंदिया शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ (सुधारित) कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती एसीबीने दिली आहे.ही कारवाई निलेश लोधी, पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गोंदिया यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. कारवाईस डॉ. दिगंबर प्रधान, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर परिक्षेत्र, तसेच अपर पोलीस अधीक्षक माधुरी बाविस्कर आणि विजय माहुलकर यांचे मार्गदर्शन लाभले.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें