देवरी: तालुक्यातील पुराडा गावात ता. ५ ऑक्टोबर २०२५ रोजी घडलेल्या दुर्दैवी घटनेत तीन तरुणांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय पुराम यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक, गोंदिया यांच्याकडे केली आहे.
या घटनेत गावातील तीन तरुण — स्व. आदित्य सुनिल बैस, स्व. तुषार राऊत आणि स्व. अभिषेक आचले— पाण्यात बुडून यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर संपूर्ण गावात संतापाचे वातावरण असून ग्रामस्थांनी दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
आमदार पुराम यांनी आपल्या पत्राद्वारे नमूद केले आहे की, या घटनेमागील सर्व कारणांची चौकशी करून सत्य बाहेर आणणे आवश्यक आहे. गावकऱ्यांनी एकमुखाने पोलिस प्रशासनाला निवेदन देऊन न्याय मिळावा अशी विनंती केली आहे.
“सदर घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तरुणांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा आणि दोषींना कायदेशीर शिक्षेस सामोरे जावे, यासाठी पोलिस विभागाने तातडीने चौकशी करावी,” असे आवाहन आमदार पुराम यांनी आपल्या निवेदनात केले आहे.
यावेळी त्यांनी घटनेतील सर्व बाबींची तपासणी करण्यासाठी संबंधित चौकशी अधिकाऱ्यांवर योग्य ती जबाबदारी निश्चित करण्याची मागणीही केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून गावकऱ्यांनी न्याय मिळेपर्यंत शांत न बसण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.









