150 लाभार्थ्यानी मोबाइल कॅंसर व्हॅनद्वारे केली आपली तपासणी
देवरी: महिलांचे आरोग्य व सक्षमीकरण हे कुटुंब, समाज आणि देशाच्या प्रगतीचे प्रमुख केंद्रस्थान आहे.जिल्ह्यात केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार दि.17 पासुन देशात सर्वत्र “स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान” सुरु आहे.त्याचाच एक भाग म्हणुन कर्करोगासारख्या गंभीर आजाराचे वेळेत निदान व्हावे व नागरिकांना मोफत उपचार मिळावेत या उद्देशाने राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने मोबाईल कर्करोग तपासणी व्हॅनद्वारे आरोग्य संस्थामध्ये कर्करोग तपासणी शिबीरे आयोजीत केले असल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पुरुषोत्तम पटले यांनी दिली आहे.
या व्हॅनद्वारे शहरासह ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांची मोफत कर्करोग तपासणी केली जात आहे.प्राथमिक आरोग्य केंद्रे व ग्रामीण रुग्णालयांना भेट देऊन एका दिवसात शंभरहून अधिक रुग्णांची तपासणी करण्याची क्षमता या व्हॅनमध्ये असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार यांनी माहीती दिली आहे.
तालुका गोंदिया येथील 6,तिरोडा येथील 3,गोरेगाव येथील 4,आमगाव येथील 4,सडक अर्जुनी येथील 3,सालेकसा येथील 4 असे एकुण 24 आरोग्य संस्थानंतर मोबाईल व्हॅन देवरी तालुक्यात दाखल झाली आहे.दि.22 सप्टेंबर रोजी पीएचसी मुल्ला येथे शिबीर झाल्यानंतर दि.23 सप्टेंबर रोजी “स्वस्थ नारी,सशक्त परिवार अभियान” अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र ककोडी येथे कर्करोग तपासणी शिबीर संपन्न झाले.या शिबिरात तब्बल 150 लाभार्थ्यांनी मोबाइल कॅंसर व्हॅनमध्ये आपली तपासणी केली असुन त्यात 64 मुख कर्करोग,43 महिलांची स्तन कर्करोग व 43 महिलांची गर्भाशय कर्करोग संबधाने तपासणी केल्याची माहीती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.ललित कुकडे यांनी दिली आहे.
यावेळेस कर्करोग संशयित रुग्णांची तिन्ही प्रकारच्या कर्करोग(स्तनाचा कर्करोग, गर्भाशय मुख कर्करोग, मुख कर्करोग) याची तपासणी करण्यात आली.मोबाइल कॅंसर व्हॅनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.स्वप्निल चिंधालोरे,मुखरोग तज्ज्ञ डॉ.शाम भोयर, शल्यचिकित्सक डॉ.अतुल डोकरीमारे,स्टाफ नर्स मिनल लंजे व स्वाती गांधळे यांनी लाभार्थ्यांची विविध तपासणी केली.
कॅन्सर तपासणी शिबीर तालुका आरोग्य अधिकारी डॉ.ललित कुकडे,प्राथमिक आरोग्य केंद ककोडीचे वैद्यकीय अधिकारी डॉ.पल्लवी बडवाईक,डॉ.वसीम यांचे मार्गदर्शनात आयोजित करण्यात आले होते.कॅन्सर तपासणी शिबिराला पदाधिकारी जिल्हा परिषद सदस्य उषाताई शहारे व जनआरिग्य समितीचे सदस्यगण यांनी भेट देवुन पाहणी केली आणि यावेळी अधिकाधिक नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घेण्याचे आवाहन याप्रसंगी केले.आरोग्य संस्थेचे वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट,प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी,स्टाफ नर्स,आरोग्य सेविका,आशा सेविका, परिचर व इतर सर्व अधिकारी/ कर्मचारी यांच्या मदतीने हे कर्करोग तपासणी शिबीर यशस्वी रित्या संपन्न झाले.









