बैलपोळा सणाला वाघाने केली बैलाची शिकार

देवरी: बैलपोळा सणाला देवरी तालुक्यातील गट ग्रामपंचायत पिंडकेपार अंतर्गत ग्राम टेकाबेदर येथील शेतकऱ्याच्या बैलाची वाघाने शिकार केल्याची घटना घडली. यामुळे शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. विजय ब्राह्मणकर रा. टेकाबेदर ता. देवरी असे हवालदिल झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि.२२ ऑगस्ट २०२५ रोजी विजय ब्राह्मणकर या शेतकऱ्याचे दोन्ही बैल नेहमी प्रमाणे सकाळी १०:०० वाजे दरम्यान खामतलाव जंगल परिसरात गुराख्याने गावातील गुरांसह चारायला नेले. दिवसभर गुरे जंगलात चरत होती. सायंकाळ झाल्यानंतर अंदाजे ५:३० वाजे दरम्यान गुरांचा कळप घरी वापस येत होता. जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक कळपातील एका बैलावर हल्ला केला. त्या हल्ल्यात बैल जागीच ठार झाला. यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. घटनेची माहिती वनविभाग देवरी येथे देण्यात आली. वन कर्मचाऱ्याची चमू घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून, परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोळा सणाच्या दिवशी वाघाने बैलाची शिकार केल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. कारण या सणाला बैलाचे पूजन आणि आदराने मिरवणूक काढल्या जाते. आणि बैलाशिवाय शेती शक्य नसल्याने, अशातच वाघाने केलेल्या शिकाऱ्यांमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याच्या श्रमाचे प्रतीक असलेल्या बैलाला गमवावे लागल्याने, त्याचा परिणाम कुटुंबाच्या उदरनिर्वाहावर झाला आहे. वाघाच्या शिकारीत बैलाला गमावल्याने शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्याला ताबडतोब भरपाई देण्यात यावी. अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.

तालुक्यात शिकारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. वन विभागाकडून नेहमीच गस्त राहते. खामतलाव जंगल शिवारात झालेल्या शिकारीमुळे परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे. तसेच अती जंगल भागात गुरे चारायला नेण्याचे टाळावे. शेतकऱ्यांनी टोळीने शेतात काम करून सायंकाळ दरम्यान शेतावरून शक्य तितक्या लवकर वापस यावे. असे आवाहन देवरी वनविभागाकडून केले आहे.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें