देवरी : बारा तासांपेक्षा अधिक काळ सतत कोसळलेल्या पावसाने मंगळवारी शहरातसह संपूर्ण जिल्हाला पावसाने झोडपले. शहरासह जिल्ह्यात रविवारी संध्याकाळपासूनच संततधार सुरू झाली. सोमवारी पावसाचा जोर वाढला. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. अनेक ठिकाणी भात शेती पाण्याखाली आहे. भात नर्सरींचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यंदाच्या मोसमातील आज सर्वाधिक 116.4 मिमी पावसाची नोंद झाली. सर्वाधिक 226.5 मिमी पाऊस देवरी तालुक्यात नोंदला गेला. अर्जुनी मोर 206.9 मिमी, तिरोडा 120 मिमी, गोंदिया 79.9 मिमी, सालेकसा 75.7, सडक अर्जुनी 74 मिमी, गोरेगाव 59.5 मिमी आणि आमगाव तालुक्यात 53.2 मिमी पावसाची नोंद झाली. शाळा, महाविद्यालयांना आज सुटी जाहीर करण्यात आली. शासकीय, निमशासकीय कार्यालयांतील उपस्थितीवर देखील पावसाने परिणाम केला. जोरदार सरींमुळे शहरातील बहुतांश भागातील रस्त्यांवर पाणी साचले होते. नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. काही भागांतील घरांमध्ये पाणी शिरले. पुजारीटोला धरणाचे गेट उघडण्यात आले. जिल्हयातील नदी नाल्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
पुरामुळे हे मार्ग बंद
देवरी तालुक्यातील चिचेवाडा -मुरदोली, डवकी-शिलापूर, गोटाबोडी-बोरगाव-शेडेपार मार्ग बंद झाले आहेत. चिचगड पोलिस ठाण्याअंतर्गत येणार्या नीलज नाल्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. घोनाडी नाल्यावरील पाण्याची पातळी वाढली असून वाहतूक बंद करण्यात आली आहे. सिंगांडोह-रोपा नाल्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने नागरिकांना पुलावरून वाहतुकीस मज्जाव करण्यात आला आहे.ककोडी/चिल्हाटी नाल्यावरील पाण्याची पातळी वाढली आहे. चिचगड ते देवरी रस्ता बंद करण्यात आला आहे.
धरणांतील साठ्यात वाढ
जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्पांनी तळ गाठला होता. दोन दिवसातील जोरदार पावसाने सर्वच धरणांतील साठ्यात वाढ झाली आहे. 9 मध्यम प्रकल्पात 15.10 दलघमी, 20 लघु प्रकल्पांत 16.590 दलघमी, 38 मामा तलावांत 2.596 दलघमी असा 23.685 दलघमी साठा झाला आहे. तिरोडा तरलुक्यातील भूराटेला मध्यम प्रकल्प 97.42 टक्के भरला आहेे. मोठया प्रकल्पांती साठ्याचा विचार केल्यास पुजारीटोला 45 टक्के, कालीसरार 10 टक्के, सिरपूर 14 टक्के, इटियाडोह 26 टक्के साठा झाला आहे.








