■ निकृष्ठ बांधकामाचा परिणाम; अग्रवाल ग्लोबल कंपनीचे पितळ उघडे, मोठ्या दुर्घटनेची शक्यता
देवरी:अवघ्या सहा महिन्यापूर्वी मासूलकसा घाट परिसरातील उड्डाण पुलाचे बांधकाम पूर्ण झाले आणि पहिल्याच पावसात महामार्गाला तडे पडले, यामुळे वाहनधारकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. एकंदरीत या महामार्गाच्या कामाचे अवघ्या काही महिन्यातच पितळ उघड पडले आहे.
सविस्तर असे की,गोंदिया जिल्हा अंतर्गत येणा-या देवरी तालुक्यातील मरामजोब मासूलकसा घाट परिसरातील राष्ट्रीय महामार्ग क्रं.५३ वरील उड्डाण पुलाला पहिल्याच पावसात भेगा पडल्याने अग्रवाल ग्लोबल कंपनीचे पितळ उघडे पडल्याने यांच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. देवरी तालुक्यातील मरामजोब मासूलकसा घाट परिसरात वन्य जीव संरक्षणाकरिता उड्डाण पुलाचे बांधकाम करण्यात आले. सदर बांधकामाचे कंत्राट शासनाने अग्रवाल ग्लोबल कंपनीला दिले होते. अग्रवाल ग्लोबल कंपनीने जवळपास अंदाजे पाच वर्षांमध्ये या उड्डाणपूलाचे बांधकाम पूर्ण केले. उड्डाण पुलावरून रहदारी सुरळीतपणे सुरू करण्यात आली. जड वाहतूक व हलके वाहतूक रात्रंदिवस धावू लागले. परंतू हवामान विभागाच्या अंदाजानुसार, देवरी तालुक्यामध्ये कालपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे मरामजोब मासूलकसा घाट परिसराततील उड्डाण पूल पूर्णतः एका बाजूने खाली बसल्याने, उड्डाण पुलाच्या एका बाजूने या रोडला मोठमोठ्या भेगा पडल्या. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. सदर उड्डाण पूल निकृष्ट साहित्याने बनविण्यात आल्याचे पहिल्याच पावसाने अग्रवाल ग्लोबल कंपनीचे पितळ उघडे पाडले आहे. सदर कंपनीवर शासनाने कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.








