देवरी : आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्रातील भारतीय जनता पक्षाचे आमदार संजय पुराम यांची विधिमंडळाच्या पंचायतराज समिती आणि उपविधान समितीवर सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीला जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत स्तरावरील प्रशासन व्यवस्थेवर सखोल, प्रभावी अभ्यास करून नियंत्रण व देखरेख ठेवण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. त्यामुळे मतदारसंघातील जिल्हा परिषद, पंचायत समित्या, तसेच ग्रामपंचायतीकडे लोकहित व कल्याणकारी कामे होण्याच्या दृष्टिकोनातून या समितीच्या माध्यमातून आमदार संजय पुराम यांना काम करण्याची संधी मिळाली आहे. आमदार संजय पुराम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांचे आभार मानले आहे. याबद्दल त्यांचे सहकारी विधिमंडळ सदस्य व मतदारसंघातून अभिनंदन करण्यात येत आहे.









