कर्ज परतफेडीची गॅरंटी घेणाऱ्याला तीन महिन्याचा कारावास

गोंदिया:  कर्ज परतफेडीची हमी घेणार्‍या व त्याने बँकेला दिलेला धनादेश न वटल्याने मुख्य न्याय दंडाधिकार्‍यांनी हमीदाराला / गॅरंटरला तीन महिन्यांचा कारावास तसेच धनादेशाची रक्कम दोन महिन्यांच्या आत देण्याचे आदेश दिले आहे. ही सुनावणी १३ मे रोजी करण्यात आली. दीपक पृथ्यानी असे शिक्षा ठोठावलेल्या हमीदाराचे नाव आहे.

आईपीसीसीएस अर्बन मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह सोसायटीकडून कर्जदार बिपीन बोधानी यांनी मोबाईल शॉपीसाठी एक लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्याने मासिक व्याजासह कर्ज फेडण्याचे कबूल केले होते. या प्रकरणातील आरोपी दीपक पृथ्यानी हा या कर्ज प्रकरणात हमीदार होता. त्याने आईपीसीसीएस अर्बन मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह सोसायटीच्या खात्याचा धनादेश तारण म्हणून दिला होता. दरम्यान मुदतीत कर्जाची परतफेड न झाल्याने या सोसायटीने एक लाख नऊ हजार ४८४ रुपयांचा धनादेश २६ जुलै २०२१ रोजी बँकेत लावला. परंतु बँकेत पर्याप्त रक्कम नसल्याने तो धनादेश वटविण्यात आला नाही. परिणामी त्या संस्थेने कर्जदाराला नोटीस बजावली. कर्जदाराने त्या नोटीसचे उत्तरही दिले नाही.  त्यामुळे कर्ज देणार्‍या सोसायटीने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकून या प्रकरणात हमी घेणार्‍या दीपक पृथ्यानी यांना तीन महिन्यांचा कारावास व कर्जाची घेतलेली रक्कम दोन महिन्यांच्या आत त्या संस्थेला देण्याचे आदेश दिले. ही सुनावणी मुख्य न्याय दंडाधिकारी अभिजित कुळकर्णी यांनी केली. या प्रकरणात संस्थेचे वकील म्हणून अ‍ॅड. डी. टी. वैरागडे यांनी जबाबदारी पार पाडली.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें