
उद्या पुराडा येथे भव्य आदिवासी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन
121जोडपे होणार विवाहबद्ध, सविता संजय पुराम व मित्र परिवार तसेच माँ धुकेश्वरी सार्व.मंदिर समिती देवरीचे आयोजन
देवरी – जि.प.सदस्या सविताताई संजय पुराम व मित्रपरिवार तसेच माँ.धूकेश्वरी मंदिर समिती देवरी यांच्या वतीने दिनांक 18 मे रोजी पुराडा येथील शासकीय आश्रम शाळा प्रांगणात भव्य आदिवासी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आदिवासी गरीब कुटुंबातील 121 जोडपे या विवाह सोहळ्यात विवाहबद्ध होणार आहेत.सामूहिक विवाह सोहळा आदिवासी धर्मातील रीती रिवाज आणि धार्मिक परंपरा नुसार भव्य पद्धतीने करण्यात येणार आहे. या सोहळ्यात विवाह करणाऱ्या जोडप्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार असून महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागातील कन्यादान योजना अंतर्गत 25 हजार रुपये अनुदानाचे जोडप्यांच्या थेट खात्यात मिळणार आहेत.या सोहळ्याचे उद्घाटन राज्याचे आदिवासी मंत्री अशोक उईके यांच्या हस्ते ,सहकार मंत्री तसेच गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. मुख्य अतिथी म्हणून खा. नामदेव कीरसान व आ. संजय पुराम, लायकराम भेंडारकर अध्यक्ष जि. प.गोंदिया हे उपस्थित राहणार आहेत.या व्यतिरिक्त जिह्यातील व तालुक्यातील सर्व नेतेमंडळी व प्रशासकीय अधिकारी तसेच समाजासह इतर समाजातील गणमान्य व्यक्ती मिळून 5 हजार नागरिक उपस्थित राहून नवदाम्पत्यांना आशीर्वाद देणार आहेत. दि.17 ला सायं.7 वाजता मंडप पूजन व प्रसिद्ध गायक राजू उईके नागपूर यांचा गोंडीयन आर्केस्ट्रा आयोजित करण्यात आला आहे. तर दिनांक 18 मे रोजी सकाळी 11 वाजता वेळेवर विवाह सोहळा संपन्न होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागामार्फत राबविण्यात येणारी कन्यादान योजना चा लाभ नागरिक घेत नसून हा निधी शासनाकडे परत जात होता.या योजनेचा लाभ आदिवासींना व्हावा म्हणून या सामूहिक विवाह सोहळ्याचे पहिल्यांदाच आपण एवढे मोठे आयोजन केले असून या विवाह सोहळ्यात विवाहबद्ध होणाऱ्या जोडप्यांना त्यांच्या खात्यामध्ये 25 हजार रुपये मिळणार असल्याचे आयोजक सविता संजय पुराम यांनी सांगितले.