सावधान! धान खरेदी केंद्र संचालकांवर गुन्हा दाखल होणार

गोंदिया: खोट्या सातबारावर धानाच्या बोनसची रक्कम भूमिहीनांच्या खात्यात जमा केल्याची धक्कादायक घटना नुकतीच शेजारील गडचिरोली जिल्ह्यात समोर आली आहे. त्यामुळे पणन विभागात खळबळ उडाली आहे. तेव्हा गोंदियात असे प्रकार घडू नयेत, यासाठी येथील पणन विभागाकडून सावधगिरी बाळगण्यात येत असून विभागातर्फे बनावट शेतकर्‍यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. तपासादरम्यान बनावट शेतकरी आढळल्यास संबंधित धान खरेदी केंद्र चालकांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे धान खरेदी केंद्र चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.

राज्य सरकारकडून फक्त नोंदणीकृत धान उत्पादक शेतकर्‍यांना धान बोनस दिला जातो. परंतु काही धान खरेदी केंद्र चालकांकडून नोंदणीकृत शेतकर्‍यांच्या यादीत भूमिहीनांची नावेही टाकून अशा बनावट शेतकर्‍यांच्या खात्यावर बोनसची रक्कम जमा करून लाखो रुपयांचा घोटाळा केला जातो.असाच एक प्रकार गडचिरोली जिल्ह्यात पुढे आला आहे. ज्या शेतकर्‍यांकडे शेत जमीन नाही अशा शेतकर्‍यांची धान खरेदी केंद्राद्वारे नोंदणी करून बोनसची रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्यात आल्याचे सांगण्यात आले. प्रकारामुळे गोंदियाचा जिल्हा पणन विभाग सतर्क झाला असून अशी फसवणूक होऊ नये, बोनसचा घोटाळा थांबवता यावा यासाठी पणन विभागाकडून संबंधित धान खरेदी केंद्रांना भेट देऊन नोंदणी केलेल्या शेतकर्‍यांची चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तपासादरम्यान बनावट शेतकरी आढळून आल्यास संबंधित धान खरेदी केंद्र चालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. दरम्यान, शुक्रवार 9 मे पासून बनावट शेतकर्‍यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आता धान खरेदी केंद्र चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.

आधारभूत किमत खरेदी योजनेंतर्गत उन्हाळी हंगामासाठी जिल्हा पणन कार्यालयाने जिल्ह्यात आतापर्यंत 15 केंद्रांना मान्यता दिली आहे. खरीप हंगामासाठी ज्या केंद्रांना धान खरेदीची मान्यता दिली त्या सर्व केंद्रांना धान खरेदीची परवानगी दिली जाईल. धान विक्रीची आभासी नोंदणीला 31 मेपर्यंत दिली आहे. धान उत्पादक शेतकर्‍यांनी जवळील केंद्रावर आवश्यक कागदपत्रे सोबत घेऊन नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा पणन अधिकारी विवेक इंगळे यांनी केले आहे.

केंद्रांवरील अनियमितता पाहता यंदाच्या रब्बी हंगामात प्रत्येक खरेदी केंद्राची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार आहे. पाहणीत अनियमितता आढळल्यास केंद्र तत्काळ निलंबित करण्यात येईल. या केंद्राना पुढील तीन वर्षे धान खरेदी करता येणार नाही. गडचिरोली जिल्ह्यातील भूमिहीन शेतकर्‍यांच्या खात्यात धान बोनस जमा होत असल्याचे प्रकरण समोर आल्याने अशा घटना रोखण्यासाठी गोंदियातही बोगस शेतकर्‍यांची चौकशी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बनावट शेतकरी आढळून आल्यास संबंधित धान खरेदी केंद्र चालकांवर कारवाई करून गुन्हा दाखल करू.

विवेक इंगले , जिल्हा पणन अधिकारी, गोंदिया

Share