
शासकीय दाखल्यांसाठी आता मोजावे लागणार दुप्पट किंमत
गोंदिया : शासनाच्या विविध शासकीय प्रमाणपत्राच्या शुल्कात दुपटीने वाढ केली आहे. यामुळे सामान्य नागरिकांवर आर्थिक बोजा वाढला आहे. जनतेने शासनाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. जातीचा, उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, आर्थिक दुर्बल घटक प्रमाणपत्र यासारख्या महत्वाच्या प्रमाणपत्रांसाठी नागरिकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. गावोगावी आपले सरकार सेवा केंद्राची स्थापना केली आहे. या सेवा केंद्राच्या माध्यमातून जात प्रमाणपत्र, उत्पन्न, राष्ट्रीयत्व, नॉन क्रिमिलेअर, रहिवासी आदी प्रकारची प्रमाणपत्रे वितरित केली जातात. अशा प्रमाणपत्राांच्या शुल्कात सरकारकडून दुपटीने वाढ केली आहे. राज्य शासनाने 25 एप्रिल पासून हे दर लागू केले आहे. 2018 मध्ये प्रमाणपत्रांच्या शुल्कात वाढ केली होती. त्यानंतर आता सात वर्षांनी वाढ केल्याचे सांगीतले जात आहे. आपले सरकार सेवा केंद्र चालकांकडून सरकारने निर्धारित केलेल्या शुल्कापेक्षा अधिक रक्कम वसूल केली जाते.
सेतू केंद्रावर विद्यार्थ्यांची गर्दी
नुकताच इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला. लवकरच दहावीचा निकाल जाहीर होईल. यंदाच्या वर्षी 15 दिवस आधीच वेगवेगळ्या शैक्षणिक प्रवेशांची लगबग सुरु होणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना रहीवासी प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र अशी कागदपत्रांची आवश्यकता भासणार असल्याने विद्यार्थ्यांसह पालकांनी आपले सरकार केंद्र तसेच सेतू कार्यालयात सर्व प्रमाणपत्र काढण्यासाठी गर्दी केली आहे.
नवीन शुल्क वाढ
प्रमाण पत्र शुल्क
- जात प्रमाणपत्र 128 रुपये
- नॉन क्रिमिलेअर 128रुपये
- उत्पन्न दाखला 69 रुपये
- रहीवासी दाखला 69 रुपये
- नॅशनॅलिटी प्रमाणपत्र 69 रुपये
- महिला आरक्षण प्रमाणपत्र 69 रुपये
- प्रतिज्ञापत्र 69 रुपये
- शेतकरी प्रमाणपत्र 69 रुपये
- भूमिहिन प्रमाणपत्र 69 रुपये
- श्रावणबाळ योजना 69 रुपये
- संजय गांधी योजना 69 रुपये