Deori : तालुक्यातील सुरतोली ग्रामपंचायती अंतर्गत हायमास्ट लाईट दुपारी ३:१५ वाजण्याच्या सुमारास आलेल्या जोरदार वादळामुळे कोसळल्याची घटना घडली. गावात नुकतीच बसवलेली ‘हायमास्ट लाईट’ कोसळून पडली. ही लाईट डिसेंबर २०२४ मध्ये स्थानिक प्रशासनाकडून सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आली होती. मात्र आजच्या अचानक आलेल्या जोरदार वादळामुळे ती जमीनदोस्त झाली. ही लाईट कोसळून थेट वीज पुरवठा करणाऱ्या तारेवर आदळली, ज्यामुळे वीजेचे तारे तुटून पडले आहेत. परिणामी संपूर्ण गावाचा वीजपुरवठा तात्पुरता खंडित करण्यात आला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून सुरक्षिततेच्या दृष्टीने यंत्रणेकडून तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे. घटनास्थळी ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील, व काही वरिष्ठ नागरिकांनी पाहणी केली असून या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.








