12 फेब्रुवारीला सरपंच/उपसरपंच पदाचा निवडणूक कार्यक्रम

जिल्ह्यातील 189 गावांच्या गावगाडा सांभाळणाऱ्या सरपंच अर्थात कारभाऱ्याची निवड येत्या 12 फेब्रुवारीपर्यंत होणार आहे.

प्रहार टाईम्स |भुपेन्द्र मस्के

गोंदिया: मिनी मंत्रालय म्हणून ओळख असणाऱ्या जिल्ह्यातील 189 गावांच्या गावगाडा सांभाळणाऱ्या सरपंच/उपसरपंच अर्थात कारभाऱ्याची निवड येत्या 12 फेब्रुवारीला होणार आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाच्या आरक्षण सोडत झाल्यामुळे सरपंचपदी कोणाची वर्णी लागणार याकडे आता गावागावात चर्चा सुरू झाली आहे.

आरक्षित राखीव जागांवर सरपंचपदाचे इच्छुक स्पर्धक कमी, तर खुल्या आणि महिलांसाठी राखीव जागांवर इच्छुकांची संख्या मोठी आहे. यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न स्थानिक पातळीवर सुरू झाले आहेत. इच्छुकांची मोर्चेबांधणी, विरोधी गटातील सदस्यांशी संपर्क, तोडफोडीच्या घटना यापुढे चालू राहणार आहेत.

राज्यात भाजप-सेना सरकार सत्तेवर आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात थेट सरपंच निवडीचा नियम केला. यामुळे तीन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत राज्यभर त्या पद्धतीने निवडी झाल्या. गेल्या वर्षी राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर आपली लोकशाही प्रातिनिधीक असल्याचे स्पष्ट करीत पुन्हा जुन्या पारंपरिक पद्धतीने सरपंच निवड सदस्यांतूनच करण्याचा निर्णय झाला. याच धर्तीवर राज्यातील साडेचौदा हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच झाल्या. निवडणूक निकालानंतर सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात आले. यावरूनही राज्यात काही प्रश्‍न उपस्थित झाले. सरपंच पदासाठी अखेर शनिवारी जिल्ह्यातील सर्व गावांसाठी आरक्षण काढण्यात आले. त्यानंतर सरपंच पदासाठी इच्छुकांनी आता मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी आरक्षण शनिवारी जाहीर झाले. नुकत्याच झालेल्या 189 ग्रामपंचायतींसह दुसऱ्या तसेच पुढील टप्प्यात होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. सरपंच निवडीच्या तारखांकडे लक्ष होते. जिल्हाधिकारी दिपक कुमार मीना याबाबत अधिकृत कार्यक्रम जाहीर केलेला आहे.

Share