‘आवास प्लस’ करणार वंचितांच्या घरकूलांची स्वप्नपूर्ती!

देवरी:  ‘आवास प्लस 2024’ या स्वतंत्र मोबाईल अ‍ॅपची निर्मीती करण्यात आली असून स्वतः लाभार्थीही या अ‍ॅपच्या माध्यमातून स्वतःचे सर्वेक्षण करून अर्ज सादर करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या लाभापासून वंचित राहिलेल्या पात्र लाभार्थ्यांची स्वप्नपूर्ती होणार असून 2018 यावर्षीच्या प्रतिक्षा यादीत ज्या लाभार्थ्यांचे नाव समाविष्ट झाले नाही तसेच काही कारणांनी जे लाभार्थी अपात्र ठरले अशा पात्र लाभार्थ्यांचे शासनाच्या वतीने 1 एप्रिलपासून ‘आवास प्लस-2024’ अंतर्गत सर्वेक्षण करून त्यांना घरकुलाचा लाभ देण्यात येणार आहे. यासाठी ‘आवास प्लस 2024’ या स्वतंत्र मोबाईल अ‍ॅपची निर्मीती करण्यात आली असून स्वतः लाभार्थीही या अ‍ॅपच्या माध्यमातून स्वतःचे सर्वेक्षण करून अर्ज सादर करू शकणार आहे.

ग्रामीण आणि शहरी भागात राहणार्‍या गरीब कुटुंबांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना सुरू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत कोट्यवधी गरीब कुटुंबांना घरकुलाचा लाभ मिळाला. परंतु आजही अनेकजण घरकुलाच्या लाभापासून वंचित आहेत. तेव्हा या वंचित लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळावा यासाठी शासनाकडून प्रधानमंत्री आवास योजना टप्पा -2 अंतर्गत आवास प्लस सर्वेक्षण -2024 ला सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान, गोंदिया जिल्ह्यात 1 एप्रिलपासून या सर्वेक्षणाला सुरुवात होणार असून मागील 2018 यावर्षी तयार करण्यात आलेल्या प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या प्रतिक्षा यादीत ज्यांचे नाव समाविष्ट झाले नाही किंवा सिस्टिमद्वारे अपात्र ठरलेले व सद्यास्थिती पात्र ठरत आहेत अशा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून त्यांना घरकुलाचा लाभ देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, हे सर्वेक्षण दोन प्रकारात होणार असून या सर्वेक्षणाची जबाबदारी ग्रामपंचायत अधिकारी/ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे देण्यात आली आहे तर शासनाच्या वतीने आवास प्लस या मोबाईल अ‍ॅपची निर्मीती करण्यात आली असतानाच पात्र लाभार्थी स्वतः आपल्या मोबाईलमध्ये प्ले-स्टोरवरून आवास प्लस-2024 हे अ‍ॅप डाऊनलोड करून स्वतःचा सर्वेक्षण करून अर्ज करू शकणार आहेत. त्यामुळे आता प्रत्येकच पात्र लाभार्थ्याला घरकुलाचा लाभ मिळणार आहे. दरम्यान, अधिक माहितीसाठी लाभार्थ्यांना ग्रामपंचायत, पंचायत समिती येथे संपर्क साधता येणार आहे. 

Share