
चेक बाऊन्स प्रकरणी ६ महिन्यांचा कारावास व दंड
देवरी: येथील दिवाणी न्यायाधीश व प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी यांनी धनादेश अनादर प्रकरणी आरोपीला सहा महिन्यांचा कारावास व 1 लाख 80 हजार रुपयांचा दंड ठोठावला. राजकुमार मेश्राम असे शिक्षा व दंड ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे.
देवरी येथील व्यापारी विनोदकुमार अग्रवाल यांचे घर बांधण्याचा करारनामा कंत्राटदार राजकुमार मेश्राम यांनी केला होता. पण मेश्राम याने करारनाम्यानुसार काम केले नाही. तसेच अग्रवाल यांच्याकडून अधिकचे पैसे घेऊन मध्येच काम सोडून दिले. करारनाम्यानुसार मेश्राम यांनी काम न केल्याने अग्रवाल यांनी राजकुमार मेश्राम यांना पैसे परत मागितले असता मेश्राम याने अग्रवाल यांना धनादेश दिला. धनादेश बँकेत जमा केला असता तो बाऊन्स झाला. याप्रकरणी विनोदकुमार अग्रवाल यांनी देवरी येथील दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली. याप्रकरणाची सुनावणी करताना सर्व पुराव्यांची पडताळणी करून देवरी येथील दिवाणी न्यायाधीश व प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांनी आरोपी राजकुमार मेश्राम याला सहा महिन्यांचा कारावास व 1 लाख 80 हजार रुपयांचा दंड ठोठावला. या प्रकरणात फिर्यादी विनोदकुमार अग्रवाल यांच्याकडून अॅड. भूषणकुमार मस्करे, अॅड. प्रीती मस्करे, अॅड. सयोग बन्सोड, अॅड. रेश्मा माहुलकर यांनी बाजू मांडली.