बत्तीगुलने 💡 देवरीसह ग्रामीण भागात संताप, कायमस्वरूपी मार्ग काढण्यास जनप्रतिनिधी असमर्थ ?

◼️दिवसाला शेकडो वेळा वीज पुरवठा खंडित 
◼️इलेक्ट्रॉनिक साहित्य व कामकाजात मोठी नुकसान होण्याची शक्यता 

प्रा.डॉ. सुजित टेटे

देवरी : देवरी तालुक्यात ग्रामीण आणि शहरी भागात मागील १५ दिवसापासून विजेच्या लपंडावाची संतापजनक समस्या वाढलेली असून शासकीय कार्यालय, खाजगी कार्यालय , बँक , शाळा महाविद्यालय येथील कामकाजावर मोठा परिणाम झालेला दिसून येत आहे. कृषीप्रधान देशाचा शेतकरी राजा यांच्या विजेच्या लपंडवामुळे चिंतेत पडला असून शेतीला पाणीपुरवठा करण्यास असमर्थ ठरत आहे. विशेष म्हणजे देवरी येथे पॉवर स्टेशनची मान्यता मिळालेली असल्याची घोषणा जनप्रतिनिधी छाती ठोकून निवडणुकीच्या वेळी मंचावरून जाहीर करतात परंतु स्वातंत्र्याच्या ७६ वर्षे उलटूनही देवरी सारख्या महामार्गावरील, औद्योगिक उन्नती करणाऱ्या तालुक्यात विजेची समस्या जनप्रतिनिधींच्या फोल घोषणावर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे.

नुकताच उन्हाळा आणि उष्ण वातावरणाला सुरुवात झाली असून विजेचा लपंडाव मोठ्याप्रमाणात सुरु झाला आहे. त्यामुळे देवरीवाशी तसेच तालुक्यातील ग्रामवाशी त्रस्त झाल्याचे बघावयास मिळत आहे. 

वीजवितरण कंपनीच्या अनियोजित कामामुळे ही स्थिती निर्माण झाली असून जनसामान्याला आज असह्य त्रास होत आहे असे प्रश्न नागरिक करीत आहेत. देवरी हे तालुक्याचे ठिकाण असून सुद्धा विजेच्या लपंडावाची समस्या बघावयास मिळत आहे ग्रामीण भागातील स्थिती याहून बिकट झाली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. महावितरण ने याकडे विशेष लक्ष देण्याची मागणी सर्वसामान्यानी केली आहे.

Share