विदेशामध्ये शिक्षणासाठी ३० एप्रिलपर्यंत करा अर्ज, राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना

 सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागामार्फत दरवर्षी अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना विशेष अध्ययन करण्यासाठी विदेशात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेंतर्गत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाकरिता विद्यार्थ्यांकडून पात्र विदेशातील शिक्षणासाठीशिष्यवृत्तीकरिता अर्ज मागविण्यात आले आहेत. fs.maharashtra.gov.in या वेबसाईटवर दि. ३० एप्रिल रोजीपर्यंत अर्ज करता येतील.

अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील मुला-मुलींना परदेशात पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाचे (पीएच.डी.) विशेष अध्ययन करण्यासाठी आर्थिक मदत देणे हा योजनेचा उद्देश आहे. 

आमच्या न्यूजलेटरसाठी साईन-अप करा

महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील पदव्युत्तर पदवी आणि पीएच.डी.साठी अद्ययावत क्युएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रैंकिंग २००च्या आतील परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेणाऱ्या ७५ विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येईल. परदेशातील विद्यापीठ, शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेणारा विद्यार्थी हा पूर्णवेळ विद्यार्थी म्हणून प्रवेशित असावा. तसेच विद्यार्थ्यांकडे जात पडताळणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. 

कोठे करणार अर्ज?
विद्यार्थ्यांनी हे अर्ज ऑनलाइन सादर करण्याची सुविधा असून, त्याची प्रत पोस्टाने किंवा समक्ष समाज कल्याण आयुक्तालय, ३ चर्च रोड पुणे ४११००१ येथे सादर करणे आवश्यक आहे.

काय आहेत नियम व अटी ?
राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांच्या कुटुंबाचे व विद्यार्थी नोकरी करीत असल्यास त्याचे स्वतःचे उत्पन्न धरून सर्व मार्गानी मिळणारे कुटुंबातील सर्व सदस्यांचे मागील आर्थिक वर्षातील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा अधिक नसावे. परदेशातील पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याने भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून ५५ टक्के गुणांसहित पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. 

अंतिम तारीख
fs.maharashtra.gov.in या वेबसाइटवर विहित नमुन्यातील परिपूर्ण भरलेला अर्ज, वाचनीय व सुस्पष्ट कागदपत्रे ऑनलाइन सादर करून त्याची सुस्पष्ट प्रिंट, ऑफलाइन नमुन्यातील अर्जासोबत समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे या कार्यालयास सादर करावी. अर्ज दि. ३० एप्रिल सायंकाळी सव्वासहा वाजेपर्यंत स्वीकारला जाईल. योजनेचा लाभघेण्यासाठी वेळेत अर्ज करावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाने केले.

Share