गोंदिया जिल्हातील तब्बल २७ हजार लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द

३ लाख १४ हजार लाडक्या बहिणी ठरल्या पात्र

गोंदिया  : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जिल्ह्यातील ३ लाख ६४ हजार २४५ लाडक्या बहिणींनी अर्ज केले होते. या अर्जाची पडताळणी करण्याचे काम सध्या सुरू असून, यात २६ हजार ९२७ लाडक्या बहिणींच्या अर्जात त्रुट्या व ते निकषात बसत नसल्याने रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे आता ३ लाख १४ हजार १७ लाडक्या बहिणींच्या खात्यावर ७ मार्च रोजी दोन हप्त्यांचे पैसे जमा होण्याची शक्यता आहे.

महिला दिनाचे औचित्य साधून राज्य सरकारने लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर जानेवारी आणि फेब्रुवारी, अशा दोन महिन्यांचे तीन हजार रुपयांचे अनुदान ७ मार्च रोजी जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचीच सध्या प्रक्रिया सुरू आहे.  जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे एकूण ३ लाख ६४ हजार २४५ लाभार्थी होते. मात्र, सुरुवातीला या योजनेसाठी पात्र नसलेल्या अनेक लाभार्थ्यांनी अर्ज करून या योजनेचा लाभ घेतला होता. ही बाब शासनाच्या निदर्शनास आल्यानंतर शासनाने अर्जाची पडताळणी करण्याचे निर्देश महिला व बाल विकास विभागाला दिले आहे. त्यात चारचाकी असणारे लाभार्थी, नोकरीवर असलेल्या, आयकर भरणाऱ्या आणि लग्न होऊन दुसऱ्या राज्यात गेलेल्या लाभार्थ्यांचे अर्ज रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत. तर काही लाभार्थी कारवाईच्या भीतीने अनुदान नको, म्हणून या विभागाकडे अर्ज करीत आहे. तर काही अर्जामध्ये पडताळणींमध्ये त्रुट्या आढळल्या. त्यामुळे असे एकूण २६ हजार ९२७ अर्ज आतापर्यंत रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील ३ लाख १४ हजार १७ लाडक्या बहिणींच्या खात्यावर जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांचे अनुदान जमा होण्याची शक्यता आहे.
३ लाख ६४ हजार अर्जाची पडताळणी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील ३ लाख ६४ हजार २४५ महिलांनी अर्ज केले होते. आता शासनाने ठरवून दिलेल्या निकषाच्या आधारावर या सर्व अर्जाची पडताळणी करण्याचे काम महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून सुरू आहे. त्यात बरेच अर्ज निकषात न बसणारे असल्याची माहिती पुढे आली आहे.

जिल्ह्यातील तालुकानिहाय पात्र व अपात्र लाभार्थी
तालुका        पात्र लाभार्थी          अपात्र लाभार्थी

गोरेगाव           ३३,५१७                   २,७१७
गोंदिया            ७९,००१                   ७,०२४
अर्जुनी मोर.      ३८,०४३                  २,५८९
सडक अ.        ३०,७१७                   २,५५६
देवरी              २९,८७९                  २,७४९
आमगाव         ३४,७८७                  २,८७५
तिरोडा            ४२,९११                   ४,७२०
सालेकसा        २५,१६२                   १,६९७
एकूण            ३,१४,०१७                २६,९२७

२० लाडक्या बहिणींनी सोडला लाभ
लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभार्थी महिलांपैकी नोकरीवर असलेल्या व अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्या २० लाडक्या बहिणींनी आतापर्यंत योजनेचा लाभ सोडण्यासाठी महिला व बाल विकास विभागाकडे अर्ज केले आहे.

५० लाडक्या बहिणींकडे चारचाकी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी सुरू आहे. त्यात ५० लाडक्या बहिणींकडे चारचाकी वाहने असल्याचे पुढे आले. त्यामुळे त्यांचे अर्ज रद्द करण्यात आले आहे, तर काही अर्जाची पुन्हा पडताळणी केली जात असल्याची माहिती संबंधित विभागाने दिली.

Share