गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील दिरंगी आणि फुलनार या गावांमध्ये माओवादी तळ असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर गडचिरोली पोलिसांनी मोठी कारवाई केली. काल १० फेब्रुवारी रोजी अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) आणि अपर पोलिस अधीक्षक (अहेरी) यांच्या नेतृत्वाखाली १८ सी-६० कमांडोंच्या पथकासह सीआरपीएफच्या क्यूएटीच्या दोन तुकड्या या भागात रवाना झाल्या होत्या. सकाळी या भागात पोलिसांनी जोरदार घेराबंदी केली, त्यानंतर माओवादी आणि सुरक्षा दलामध्ये दिवसभर चकमक सुरू राहिली. या संयुक्त कारवाईत पोलिसांनी माओवाद्यांचा तळ उद्ध्वस्त केला असून, नक्षलवादी साहित्य व विविध वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.
या धडक कारवाईदरम्यान सी-६० पथकातील एक जवान गोळी लागून जखमी झाला. तातडीने त्याला हेलिकॉप्टरच्या मदतीने वैद्यकीय उपचारांसाठी गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान पोलीस अंमलदार महेश कवडू नागुलवार (३९) मूळ गाव अनकोडा, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली) यांनी वीरमरण पत्करले.
शहीद जवान महेश नागुलवार यांचा अंत्यविधी उद्या, १२ फेब्रुवारी २०२५ रोजी त्यांच्या मूळ गावी अनकोडा, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली येथे शासकीय इतमामात केला जाणार आहे. त्यांच्या पार्थिवावर शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
गडचिरोली पोलीस दलाने शहीद जवान महेश नागुलवार यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचे सांगितले आहे. आमचे जवान आपल्या कर्तव्यावर प्राण अर्पण करत आहेत. आम्ही त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असे गडचिरोली पोलिस दलाच्या वतीने सांगण्यात आले.
गडचिरोली जिल्ह्यातील जंगल पट्ट्यात गेल्या काही दिवसांपासून माओवादी हालचालींमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी आपले अभियान अधिक तीव्र केले आहे. माओवाद्यांविरोधात सतत मोहिमा राबविल्या जात असून, त्यांना नामोहरम करण्यासाठी सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त वाढवला आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील या धडक कारवाईने माओवाद्यांना मोठा धक्का बसला असून, पुढील काही दिवस पोलिसांचे शोध अभियान सुरूच राहणार आहे.









