राज्य परिवहन महामंडळाच्या अनेक बसेस जर्जर असून याचा प्रत्येय 12 फेब्रुवारी रोजी आला. तिरोडा आगाराची तिरोडा-गोरेगाव बस मार्गावर कुर्हाडी येथे बंद पडली. त्यामुळे रहदारी ठप्प झाली होती. या वेळी वाहनधारकांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागले.
तिरोडा आगाराची बस क्रमांक एमएच 40 एन 9507 ही गोरेगावरून प्रवासी घेऊन तिरोडाच्या दिशेने निघाली. दरम्यान गोरेगाव-तिरोडा मार्गावर कुर्हाडी येथे बुधवारी दुपारी 1.20 वाजताच्या सुमारास बस अचानक बंद पडली. मुख्य रस्त्यावर मधोमध बस उभी राहिल्याने वाहतूक ठप्प झाली. ST BUS शेवटी प्रवाश्यांनी खाली उतरून धक्का देत बस बाजूला केले. त्यामुळे या बसने प्रवाश्यांचाही घाम फोडला. भंडारा विभागातील गोंदिया, तिरोडा, साकोली, तुमसर, पवनी व भंडारा आगारात 375 बसेस आहेत विविध मार्गावर दैनिक 2054 फेर्या धावतात. जवळपास 80 टक्के जुन्या बस आहेत. यातील अनेक बसेस जर्जर झाल्या आहेत. अनेकदा त्या प्रवासातच बंद पडतात. या बसेसमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आगारातून निघाल्यावर बस मोठ्या प्रमाणावर बंद पडत आहेत. बसची टायर रिमोट वापरली जात आहेत. बरेच टायर गुळगुळीत झाले आहेत. काहींच्या तर तारा दिसत आहेत. बसच्या बॉडी अक्षरशः हलतात. मोठा आवाज येतो. अधिकारी व कर्मचारीदेखील त्रस्त झालेले आहेत. याकडे वरिष्ठांनी लक्ष घालावे, अशी मागणी प्रवाश्यांनी केली आहे. आगारातील बस सुस्थितीत आहेत. मात्र काहीना काही तांत्रिक बिघाड होतो. त्यांची दुरुस्ती करून घेतो. अशी प्रतिक्रिया संजना कटरे आगारप्रमुख, तिरोडा यांनी माध्यमांना दिली.









