अपुर्ण असलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करावे- जलसंपदा मंत्री जयंत पाटील


गोंदिया,दि.31 : जिल्ह्यातील बरेचशा सिंचन प्रकल्पाचे काम अपुर्ण असल्यामुळे पाणी टंचाई भासत असते. सिंचन प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याकरीता शासन स्तरावर योग्य तो निधी देण्यात येईल. यासाठी अपुर्ण असलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात यावे. असे मत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
31 जानेवारी रोजी गेट वे हॉटेल गोंदिया येथे आयोजित बैठकीत श्री पाटील बोलत होते. यावेळी खासदार प्रफुल पटेल, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिपकुमार डांगे, माजी खासदार डॉ.खुशाल बोपचे, माजी आमदार राजेंद्र जैन, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.


जलसंपदा मंत्री श्री पाटील म्हणाले, जिल्ह्यात असलेले धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्प योजना टप्पा-1 चे काम पूर्ण झाले आहे. परंतू धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्प योजना टप्पा-2, कटंगी मध्यम प्रकल्प, रजेगाव काटी उपसा सिंचन योजना, कलपाथरी मध्यम प्रकल्प, तेढवा शिवनी उपसा सिंचन योजना, झाशीनगर उपसा सिंचन योजना, देवरी नवेगाव उपसा सिंचन योजना, बेवारटोला लघु प्रकल्प, पांढरवाणी उपसा सिंचन योजना, निमगाव लघु प्रकल्प, आसोली लघु प्रकल्पाची कामे अपूर्ण अवस्थेत असल्यामुळे जिल्ह्यात पाणी टंचाई भासत आहे. त्यामुळे अपूर्ण असलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी शासन स्तरावर योग्य तो निधी देण्यात येईल. सद्यस्थितीत जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात जो पाणीसाठा आहे त्याचे शेती आणि पिण्यासाठी योग्य नियोजन करावे असे त्यांनी सांगितले.
सभेला गोसेखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता के.सु.वेमुलकोंडा, भंडारा सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता रा.श्री.सोनटक्के, बाघ इटियाडोह पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता डी.बी.भिवगडे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री मानवटकर, मध्यम प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता अ.प्र.कापसे, भंडारा पाटबंधारे प्रकल्प अन्वेषण विभागाचे कार्यकारी अभियंता आर.आर.बावनकुळे व धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता अनिल फरकाडे उपस्थित होते.

Share