
जिल्हा बँकेने नोकर भरतीतील सामाजिक आरक्षण वगळले
गोंदिया: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नोकर भरतीची प्रकिया आहे. मात्र भरतीमध्ये सामाजिक आरक्षण लागू करण्यात न आल्याने सहकार क्षेत्रातील बँकातून सामाजिक आरक्षण संपवण्याचे षडयंत्र असल्याचा सूर सामाजिक संघटनांमध्ये उमटू लागला आहे. दरम्यान जिल्हा बहुजन समाज पक्षाच्यावतीने मुख्यमंत्री, सहकार मंत्री यांना निवेदन पाठवून भरती प्रकिया रद्द करून सामाजिक आरक्षणानुसार नोकर भरतीची मागणी केली आहे, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनात नमूद केला आहे.
गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून द्वितीय श्रेणी 5, लिपीक 47 व शिपाई पदाच्या 25 अशा 77 पदासांठी नोकरभरती केली जात आहे. 30 जानेवारी अर्ज करण्याची शेवटची तारीख होती.भरतीमध्ये ओबीसी, एससी, एसटी, एनटी प्रवर्गासाठी आरक्षण न ठेवता सर्व पदे खुल्या प्रवर्गातून भरण्यात येत असल्याचे प्रकाशित जाहिरातीत दिसून येते. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेद्वारे शिपाई व लिपिक पदाच्या 358 पदांसाठी नोकरभरती केली जात आहे.
या बँकेनेही ओबीसी, एससी, एसटी, एनटी प्रवर्गासाठी पदे आरक्षीत केली नाहीत. भरतीत गैरप्रकार झाल्याचा आरोप झाला. आता सहकार विभागाच्या धोरणाविरूद्ध येथे उमेदवार व सामाजिक संघटनांनी आंदोलन पुकारले आहे. आता गोंदियातील सामातिक संघटना एकवटल्या असून भरती प्रकिया रद्द करून सामाजिक आरक्षणानुसार नोकर भरती करावी, अन्यथा आंदोलन छेडू असा इशारा शासनाला पाठविलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. सहकारी बँकामध्ये शासनाची थेट गुतंवणूक नाही, शासन निधीचा लाभ मिळत नाही, अशा बँकांना नोकर भरतीत सामाजिक आरक्षणातून वगळण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या नोकरभरतीमध्ये सामाजिक आरक्षण लागू होत नाही.
प्रविण गायकवाड
विभागीय सहकार निबंधक, नागपूर
न्यायालयाच्या निर्णयानंतर विभागीय निबंधकांनी दिलेल्या आदेशानुसारच नोकर भरती करण्यात येत आहे.
सुरेश टेटे
सीईओ जिल्हा सहकारी बँक, गोंदिया