
न्यायालयाच्या माध्यमातून तालुक्यातील जनतेला जलद न्याय मिळेल – न्यायमूर्ती भूषण गवई
⬛️ देवरीत दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे उद्घाटन संपन्न
देवरी – सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठीची जबाबदारी केवळ न्यायाधीशांची नसून ती वकील वर्गाची सुद्धा आहे . न्यायदान क्षेत्रामध्ये वकिल महत्वाचा घटक आहे. सर्वांनी मिळून न्यायालयाच्या कायद्याचा लाभ सामान्य जनतेपर्यंत पोहोचवावा. व शेवटच्या व्यक्तीला वेळेत न्याय देण्याचा प्रयत्न या न्यायालयाच्या माध्यमातून व्हावा.असे प्रतिपादन न्यायमूर्ती भूषण गवई सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांनी केले. देवरी येथे शनिवार 8फेब्रुवारी रोजी दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर आलोक आराधे मुख्य न्यायमूर्ती उच्च न्यायालय मुंबई, नितीन सांबरे वरिष्ठ प्रशासकीय न्यायमूर्ती उच्च न्यायालय मुंबई, नागपूर खंडपीठ नागपूर, महेंद्र चांदवाणी न्यायमूर्ती उच्च न्यायालय मुंबई तथापालक न्यायमूर्ती गोंदिया जिल्हा, राजेश जोशी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश गोंदिया, परिजात पांडे विदर्भ बार कौन्सिल अध्यक्ष,सुलभा चरडे दिवाणी न्यायाधीश देवरी,प्रशांत सांगिडवार अध्यक्ष वकील संघ देवरी हे उपस्थित होते. पुढे बोलताना न्यायमूर्ती गवई म्हणाले की, दिवाणी व फौजदारी न्यायालयामुळे तालुक्यातील खटले वेगाने चालून नागरिकांना वेळेत आणि गतीने न्याय मिळू शकेल.त्यांनी गोंदिया जिल्ह्याशी स्वतःचे जवळचे नाते असल्याचे सांगून येणाऱ्या काळात देवरी मध्ये मागणी असलेली जिल्हा सत्र व सिनियर डिव्हिजन ची मागणी पूर्ण करणार असल्याचे सांगितले.तसेच राईट टू जस्टीस प्रमाणे न्याय पक्षकारांच्या दारी या संकल्पनेतून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी न्यायालय होणार असल्याचे सांगितले.यावेळी मुंबई उच्च न्यायालयांचे न्यायाधीश आलोक आराधे म्हणाले की, ग्रामीण भागातील लोकांना ग्रासरूट लेवलवर न्यायदानाची व्यवस्था सदर न्यायालयातून होणार आहे. न्यायमूर्ती भूषण गवई साहेबांनी केलेली सुरुवात आज पूर्णत्वास आली असून देवरी न्यायालयाच्या भव्य इमारतीमुळे स्वप्नपूर्ती झालेली आहे. कार्यक्रमाची सुरुवात न्यायमूर्तींच्या हस्ते रोपट्याना पाणी देवून करण्यात आले.सर्व मान्यवरांचे शाल, श्रीफळ, रोपटे, स्मृतिचिन्ह व बास्केट देवून गौरविण्यात आले.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतून देवरी तालुका वकील संघाचे अध्यक्ष प्रशांत संगीडवार यांनी अतिदुर्गम भागातीaल पक्षकारांना गोंदिया येथे जाणे कठीण होत असल्याने देवरी न्यायालयात जिल्हा सत्र व सिनियर डीविजन देण्याची मागणी केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन न्यायाधिश प्राजक्ता ढाने व तेजश्री गवई यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देवरी तालुका वकील संघाच्या सर्व वकिलांनी अथक परिश्रम घेतले.