पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण जाहीर, देवरी सर्वसाधारण

गोंदिया: जिल्ह्यातील आठ पंचायत समिती सभापती पदासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आरक्षण सोडत काढण्यात आली. तीन ठिकाणी सर्वसाधारण, तीन ठिकाणी सर्वसाधारण महिला, एका ठिकाणी अनुसूचित जाती महिला व एका ठिकाणी अनसूचित जमाती सर्वसाधारण सभापती असे आरक्षण जाहीर झाले आहे.

जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आरक्षण सोडत एका चिमुकलीच्या हस्ते काढण्यात आली. यावेळी जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, उपजिल्हाधिकारी (सामान्य) मानसी पाटील, अधिकारी व विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.  गोंदिया पंचायत समिती सभापती पद सर्वसाधारण, आमगाव सर्वसाधारण (महिला), सालेकसा सर्वसाधारण (महिला), गोरेगाव सर्वसाधारण (महिला), तिरोडा सर्वसाधारण, सडक अर्जुनी अनुसूचित जमाती, देवरी सर्वसाधारण व अर्जुनी मोरगाव अनुसूचित जाती (महिला) साठी राखीव असणार आहे.

पंचायत समिती सभापती पदासाठीची ही सोडत स्वरा सोमवंशी (4) या बालिकेच्या हस्ते ईश्वर चिठ्ठीद्वारे काढण्यात आली. मानसी पाटील यांनी आरक्षणाबाबतची प्रक्रिया उपस्थितांना समजावून सांगितली. लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार उतरत्या क्रमाने पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण ठरविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रसंगी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या प्रश्नाचे व शंकेचे समाधान अधिकार्‍यांनी केले. 20 जानेवारी रोजी जिल्ह्यातील आठही पंचायत समितीमध्ये पंचायत समिती सभापती पदाची निवडणूक घेण्यात येणार असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले.

Share