गोंदियात पुन्हा थंडीची हुडहुडी

गोंदिया: जिल्ह्यात मागील पंधरवाड्यात तापमानात वाढ झाल्याने थंडी कमी झाली होती. मात्र दोन दिवसात तापमान अचानक घटले असून आज, 1 जानेवारी विदर्भात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात 11.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

जिल्ह्यात दिवाळीनंतर थंडीची चाहूल लागली. तापमानात सातत्याने घट होत त्यानंतरच्या कालावधीत 10 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान नोंदविले गेले. मात्र मागील पंधरवाड्यात ढगाळ वातावरणामुळे थंडी कमी झाली होती. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र मागील दोन दिवसापासून पुन्हा तापमान घटत असून आज, 1 जानेवारी रोजी 11.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. विदर्भात सर्वाधिक कमी तापमान जिल्ह्यात नोंदविले गेले. त्याखालोखाल नागपूर 14.3, भंडारा 14.4, ब्रम्हपुरी 14.4, बुलढाणा 14.6, अकोला 15.5, अमरावती 15.7, गडचिरोली 15.8, वर्धा 15.8 व वाशिम येथे 18.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले.

Share