नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जिपच्या 12 तंबाखूबहाद्दरांवर कारवाई
गोंदिया: शासकीय कार्यालयात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ बाळगणे, त्यांचे सेवन करण्यास मनाई आहे. यातंर्गत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमातंर्गत आरोग्य विभागाच्या पथकाने नववर्षाच्या पहिल्याच दिवशी 1 जानेवारी रोजी तंबाखु मुक्त युवा अभियान अंतर्गत बुधवारी जिल्हा परिषद कार्यालयात धाडसत्र राबविण्यात आले. यावेळी 12 तंबाखू व गुटखा सेवन करणार्या कर्मचार्यांवर दंड ठोठावण्यात आला.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम यांच्या परवानगीने व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा परिषदेतील विविध विभागात धाड टाकून 12 तंबाखू, गुटखा खाणार्या व बाळगणार्या कर्मचार्यांवर तंबाखू नियंत्रण कोटपा कायदा 2003 अंतर्गत दंडात्मक कारवाई करून 2 हजार 130 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यावेळी कर्मचार्यांकडे तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. ही कारवाई अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तानाजी लोखंडे, जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी डॉ. अनिल आटे, दंत शल्य चिकित्सक डॉ. अमोल राठोड, जिल्हा आयईसी अधिकारी प्रशांत खरात, माहिती सहाय्यक अधिकारी कैलास गजभिये, जिल्हा सल्लागार डॉ. ज्योती राठोड, मनोवैज्ञानिक सुरेखा मेश्राम, सामाजिक कार्यकर्ता संध्या शंभरकर, दंत सहाय्यक विवेकानंद कोरे, पोलिस शिपाई सचिन फसाटे व शालिनी तुर्कने ग्रामीण पोलिस स्टेशन गोंदिया यांनी पार पाडली.
जिल्ह्यात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या प्रभावी अमलबजावणीसाठी आरोग्य विभागामार्फत पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. सर्व शासकीय कार्यालयात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ बाळगणे, त्यांचे सेवन करण्यास मनाई आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांची तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील सर्वच शासकीय कार्यालयांची तपासणी करण्यात येणार आहे.