देवरी तालुक्यात पारा घसरला, गोंदिया विदर्भात सर्वाधिक थंड

गुलाबी थंडीला सुरूवात 

देवरीः आठवडाभरापासून जिल्हावासी गुलाबी थंडीचा अनुभव घेत आहे. मागील तीन दिवसात संपूर्ण विदर्भात पहिल्या क्रमांकाच्या निच्चांकी तापमानाची नोंद गोंदिया जिल्ह्यात घेण्यात आली. बोचर्‍या थंडीने जिल्हा गारठल्याचे चित्र असून नागरिक उबदार कपड्यासह शेकोटीचा आधार घेत आहेत.

यंदा हिवाळ्याची सुरुवात होऊन व दिवाळी सण आटोपल्यावरही तापमान कमी झालेले नव्हते. मात्र मागील आठवड्यापासून तापमानात सातत्याने घट होत आहे. उत्तर भारतातील डोंगरात प्रदेशात होणारी बर्फवृष्टी व राजस्थानमधून येणार्‍या थंड वार्‍यामुळे राज्यासह जिल्ह्यातही थंडीचा जोर वाढला आहे. मागील तीन दिवसात संपूर्ण विदर्भात जिल्ह्यात दुसर्‍या क्रमांकाची निच्चाकी तापमानाची नोंद झाली आहे. तीन दिवसापासून जिल्ह्यात९.८ अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली आहे. आगामी आणखी काही दिवस थंडीचा जोर कायम राहणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहे. दिवसाही वाहणार्‍या थंड वार्‍यामुळे बोचर्‍या थंडीचा सामना जिल्हावासींना करावा लागत आहे. त्यामुळे गरम कपडे घालुनच नागरिक घराबाहेर पडत आहे. ग्रामीण भागात ठिकठिकाणी शेकोट्या पेटवून उब मिळविण्याचा प्रयत्न ग्रामस्थ करीत असल्याचे दिसत आहे.

उत्तरेकडील हिमवृष्टीचा परिणाम आता विदर्भात येत आहे. मंगळवारी ४ अंशांनी घसरून १२ अंशांवर तर बुधवारी पुन्हा २ अंशांची घसरण होत १० अंशांवर आल्यानंतर गुरुवारी नागपूर व गोंदियामध्ये किमान ९.८ अंश सेल्सिअस नोंदविले. थंडीच्या लाटेत नागपूर गारठले असून पुढील दहा दिवस गुलाबी थंडी अशीच कायम राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. सध्याच्या घडीला उत्तर मध्यप्रदेश, सौराष्ट्रच्या भागात थंडीची लाट आली आहे. उत्तरेकडून वाहत येणार्‍या थंड वार्‍यामुळे नागपूर शहर गारठले आहे. गत चार पाच दिवसांपासून तापमान घसरण्याचे सत्र कायम असल्याने स्वेटरच्या खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. यंदाच्या हिवाळ्यातील सर्वांत कमी तापमानाची नोंद झाली असून नागरिकांना शेकोटी पेटवून थंडीचा सामना करावा लागत आहे.

दहा दिवसांपूर्वी ढगाळ थंडी गायब झाली होती. मात्र आता पुन्हा थंडीने जोर पकडला आहे. डिसेंबरच्या तिसर्‍या आठवड्यात सुध्दा थंडीमुळे पारा घसरण्याची शक्यता आहे. गत चार दिवसात तापमान ९ ते ११ अंशांनी खाली घसरले. हवामान विभागाच्या अंदाजानुसार थंडीचा हा प्रकोप २२ डिसेंबरपर्यंत कायम राहणार आहे.

Share