जिप अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची माळ कुणाच्या गळ्यात

गोंदिया: : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापतींचा अडीच वर्षांचा कार्यकाळ 9 नोव्हेंबरला पूर्ण झाला. राज्य विधीमंडळाच्या निवडणुकीमुळे अडीच वर्षांच्या कालावधीसाठी पदाधिकार्‍यांची निवड करण्याचा कार्यक्रम जाहीर झाला नव्हता. आता निवडणुका आटोपल्या असून लवकरच जिप अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती यांच्या पुढील अडीच वर्षांसाठी पद निवडीचा कार्यक्रम प्रशासनाकडून जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापती पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता जिल्हावासीयांना लागली आहे.

जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष पंकज रहांगडाले, उपाध्यक्ष यशवंत गणवीर, बांधकाम व अर्थ सभापती संजय टेंभरे, कृषी व पशुसंवर्धन सभापती रुपेश कुथे, महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम, समाजकल्याण सभापती पूजा सेठ यांची अडीच वर्षांच्या कालावधीसाठी निवड करण्यात आली होती. या सर्व पदाधिकार्‍यांचा अडीच वर्षांचा कालावधी 9 नोव्हेंबर 2024 रोजी पूर्ण झाला. त्यामुळे पुढील कालावधीसाठी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती यांची निवड करण्यासाठी निवडणूक कार्यक्रम विधानसभा निवडणुकीमुळे लांबणीवर गेला होता. आता निवडणुक पार पडून नविन सरकार स्थापन झाले आहे. प्रशासनसह नेते मंडळी सुद्धा थोडे निवांत झाले आहेत. नवीन जि.प. पदाधिकार्‍यांची निवड करण्याचा कार्यक्रम लवकर जाहीर होण्याची शक्यता आहे. 53 सदस्यीय गोंदिया जिल्हा परिषदेमध्ये भाजपाचे 26 सदस्य, काँग्रेस 13, राष्ट्रवादी काँग्रेस 8, चाबी संघटना 4 व अपक्ष 2 असे पक्षीय बलाबल आहे. राष्ट्रवादी व दोन अपक्षांनी भाजपाला पाठिंबा देत सत्ता स्थापन केली होती. आता पुढील कालावधीसाठी अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापती पदासाठी अनेकांची नावे चर्चेत असली तरी माळ कुणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता जिल्हावासीयांनी लागली आहे.

Share