प्रचारासाठी वाहनांवर विनापरवानगी फलक, झेंडे लावण्यास मनाई
गोंदिया : सर्व राजकीय पक्षांचे उमेदवार ,अपक्ष उमेदवार, त्यांचे हितचिंतक आणि कार्यकर्ते यांना परवानगीशिवाय निवडणूक प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांवर प्रचार फलक लावणे, झेंडे लावणे इत्यादी बाबींवर निवडणूक प्रक्रिया २५ नोव्हेंबर पर्यंत पूर्ण होईपर्यंत जिल्हाधिकारी प्रजीत नायर यांनी निर्बंध घालण्याचे आदेश दिले आहेत.
या आदेशान्वये फिरत्या वाहनांवर पक्ष प्रचाराचा झेंडा हा वाहनाच्या डाव्या बाजूला विंड स्क्रीन ग्लासच्या पूढे राहणार नाही आणि ते त्या वाहनाच्या टपापासून दोन फुट उंचीपेक्षा जास्त राहणार नाही. प्रचाराच्या फिरत्या वाहनांवर कापडी फलक वाहनचालकाच्या आसना मागे वाहनाच्या डाव्या व उजव्या बाजूने लावण्याक यावा. इतर कोणत्याही बाजूने तो लावण्यात येणार नाही. फिरत्या वाहनांवर लावावयाचा पक्ष प्रचारांचा झेंडा किंवा कापडी फलक संबंधित पक्षाचे जिल्हाध्यक्ष, उमेदवार व उमेदवाराचे निवडणूक प्रतिनिधी यांनी निवडणूक प्रचारासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून अधिकृत परवानगी घेतलेल्या वाहना व्यतिरिक्त इतर कोणत्याही वाहनावर लावता येणार नाही. हे आदेश निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अंमलात राहतील. या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम २२३ अन्वये कारवाई केली जाईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशित केले आहे.
विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. जिल्ह्यातील संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणाम पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून निवडणूक प्रचारासाठी कोणत्याही व्यक्तिगत जागा, इमारत, आवार भिंत आदी संबंधित जागा मालकांच्या पूर्व परवानगी शिवाय व संबंधित परवाना देणाऱ्या प्राधिकरणाच्या परवानगी शिवाय वापर करण्यास निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जिल्हादंडाधिकारी यांनी निर्बंध घातले आहेत.