119 रस्ते उठले प्रवाशांच्या जीवावर, देवरी तालुक्यात सर्वाधिक 26 रस्ते जीर्ण

देवरी तालुक्यात सर्वाधिक 26 रस्ते, निधीची मागणी करूनही मिळत नसल्याचा आरोप

गोंदिया : नक्षलग्रस्त भागातील रस्ते गुळगुळीत असावे, असा शासनाचा नियम आहे. मात्र त्या नियमांना जिल्ह्यातील यंत्रणांनी बगल दिली आहे. जिल्ह्यातील तब्बल ११९ रस्ते खड्डेमय आहेत तर एकूण १६४ जीर्णावस्थेत असल्याची माहिती खुद्द बांधकाम विभागाकडून मिळाली. निधी मागूनदेखील मिळत नसल्याने दुरुस्ती किंवा बांधकाम करता येत नाही, असे विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

दररोज लाखो लोकांची वर्दळ असलेले पूल, रस्ते आणि नाल्या अशा जिल्ह्यातील एकूण ११९ रस्त्यांची हालत खस्ता झाल्याची कबुली खुद्द जिल्हा परिषद देत आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यांतील रस्त्यांचा यामध्ये समावेश आहे. या रस्त्यांवर यमराज टपून बसला आहे. या रस्त्यांच्या बांधकामासाठी ४२ कोटी ५३ लाख रुपये लागणार असल्याने ती मागणी जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाने शासनाकडे केली आहे. एक किमीच्या आत शेकडो खड्डे असून ते मृत्यूला आमंत्रण देत आहेत. एक खड्डा वाचविण्याच्या नादात वाहन दुसऱ्या

खड्डयात जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र या खड्यांच्या दुरुस्तीसाठी पावले उचलत नाही. त्यामुळे या रस्त्यावर बसलेला यमराज कधी कुणाचा बळी घेईल, हे सांगता येत नाही. या खड्यांमुळे अनेकांना प्राणाला मुकावे लागले आहे. जिल्ह्यात दौऱ्यावर जाणारे पोलिस अधीक्षक, मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांसह सर्वच लहान- मोठ्या अधिकाऱ्यांना हे रस्ते दिसत नाही काय ? असा सवाल नागरिक करित आहेत. रस्त्यांची हालत खस्ता झाली असून, या रस्त्यांची डागडुजी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी पुढे येत नाही. येथील रस्त्यांवर मोठे खड्डे असून, त्यावरून वाहन चालविताना वाहनाचे संतुलन बिघडते. रस्त्यांवरील खड्यांमुळे अनेकांचा बळी गेला. उदासीन असलेल्या प्रशासनाने जागे व्हावे, असा नागरिकांचा सूर आहे. या रस्त्यांवरील खड्ड्यांनी अनेकांचा जीव घेतला. हा रस्ता आणखी किती बळी घेणार? असा सवाल नागरिक करित आहेत

नादुरुस्त रस्ते, पुलांचा लेखाजोखा

गोंदिया तालुक्यात २३ नादुरुस्त रस्ते असून १ मोरी जीर्ण आहे. गोरेगाव तालुक्यातील १५ रस्ते, तिरोडा तालुक्यात ४. आमगाव तालुक्यात ५, सालेकसा तालुक्यात १२, देवरी तालुक्यात २६, अर्जुनी मोरगाव तालुक्यात १७ आणि सडक अर्जुनी तालुक्यातील १७ रस्ते नादुरुस्त आहेत. सालेकसा तालुक्यातील ५. देवरी तालुक्यातील एक आणि सडक अर्जुनी तालुक्यातील दोन पूल जीर्ण आहेत. त्याचबरोबर गोंदिया तालुक्यात एक, तिरोडा ७, आमगाव २२, सालेकसा ६ आणि देवरी तालुक्यातील एक मोरी जीर्ण असल्याची नोंद जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात आहे.

Share