राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करावी- कविता गायकवाड, निवडणूक निर्णय अधिकारी

देवरी : 66- आमगाव (अ.ज.) विधानसभा मतदारसंघांमध्ये विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अनुषंगाने सर्व राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करावी या सबंधित उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक अधिकारी यांची पत्रकार परिषद पार पडली.

भारत निवडणूक आयोगाचे दि. 15/10/2024 रोजी दुपारी 3.30 वाजता पार पडलेल्या प्रेस कॉन्फरन्स मधील निर्देशानुसार सार्वत्रिक विधानसभा निवडणूक 2024 साठी आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर करावयाच्या विविध कार्यवाही बाबत विविध राजकीय पक्ष व त्यांचे प्रतिनिधीं यांची आढावा बैठक उपविभागीय अधिकारी आमगाव (अ. ज.) विधानसभा मतदारसंघ यांच्या कार्यालयात आज दि. 15.10.2024 दुपारी 05.00 वाजता आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीमध्ये जाहीर झालेल्या निवडणूक कार्यक्रमाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी बाबत सविस्तरपणे सूचना व भारत निवडणूक आयोगाच्या आचारसंहिता संदर्भातील काय करावे व काय करु नये (DOs & DONT’s) आणि Expenditure Monitoring, Paid News संदर्भातील सर्व मार्गदर्शक सूचना व स्थायी आदेश लागू झालेबाबत विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांना सदर बाबी निदर्शनास आणून देण्यात आल्या व आदर्श आचारसंहितेचे पालन होईल याबाबत योग्य ती दक्षता घेण्याबाबत सूचित केले.

(1) संपत्तीचे विद्रुपीकरण-
(a) शासकीय संपत्तीचे विद्रुपीकरण या उद्देशासाठी सरकारी जागेत कोणतेही सरकारी कार्यालय आणि कार्यालयाची इमारत ज्या परिसरामध्ये आहे, त्या परिसराचा समावेश असेल. सर्व शासकीय मालमत्तेच्या भिंतीवरील लेखन, पोस्टर्स/पेपर किंवा इतर कोणत्याही स्वरूपातील कटआउट/होर्डिंग्ज इत्यादी जाहिरातींची फलके तसेच बॅनरर्स आणि झेंडे निवडणूक जाहीर झाल्यापासून २४ तासांच्या आत काढून टाकण्याबाबत सुचित केले.

(b) सार्वजनिक मालमत्तेची विद्रुपीकरण आणि सार्वजनिक जागेचा गैरवापर – यामध्ये सार्वजनिक संपत्तीच्या भिंतीवरील लेखन, पोस्टर्स/पेपर्स किंवा कटआऊट/होडींग्स / बॅनरर्स/झेंडे इत्यादी आणि सार्वजनिक ठिकाणी जसे रेल्वे स्टेशन, बसस्टँड, विमानतळ, रेल्वेपूल, रस्ते, शासकीय बसेस, इलेक्ट्रीक / टेलिफोन खांब, नगरपालिका आणि स्थानिक स्वराज संस्थेच्या इमारती येथील अनधिकृत राजकीय जाहिराती निवडणूका जाहिर झाल्यापासून ४८ तासात काढून टाकण्याबाबत निर्देशित केले.

(c) खाजगी मालमत्तेची विद्रुपीकरण खाजगी मालमत्तेवरील सर्व अनधिकृत राजकीय जाहिराती निवडणूका जाहिर झाल्यापासून ७२ तासामध्ये काढून टाकण्याबाबत निर्देशित केले.

(2) शासकीय वाहनांचा दुरुपयोग निवडणूक जाहिर झाल्यापासून २४ तासामध्ये राजकीय पक्ष, उमेदवार किंवा अन्य निवडणूकांचा प्रचार, प्रसार अथवा निवडणूकीसंबंधी कामकाजासाठी शासकीय वाहनाचा उपयोग करण्यासाठी संपूर्ण बंदी करण्याबाबत सूचना देण्यात आल्या.

(3) सार्वजनिक निधीच्या खर्चावरील जाहिराती सरकारी निधीतून राजकीय बातम्यांचे पक्षपाती प्रक्षेपण आणि सत्तेतील पक्षाची प्रसिध्दी वाढविण्याच्या उद्देशाने निवडणूक काळात अधिकृत मिडियाव्दारे, इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मिडियाव्दारे सरकारच्या कामगिरीवर प्रकाश टाकणाऱ्या कोणत्याही जाहिराती दिल्या जाणार नाहीत. आधीच प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातींचे प्रसारण ताबडतोब बंद केले जाईल व तद्नंतर अशी कोणतीही जाहिरात कोणत्याही वर्तमानपत्र, मासिके, इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मिडियामध्ये प्रकाशित होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. निवडणूक जाहिर झाल्यानंतर सार्वजनिक निधीतून करण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या जाहिराती तात्काळ बंद करण्यात याव्यात असे सांगितले.
(4) शासकीय संकेतस्थळावरील राजकीय कार्यकर्त्यांचे छायाचित्रे राज्य शासनाच्या सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी आपल्या प्रशासकीय विभागाच्या व आपल्या अधिनस्त कार्यालयाच्या अधिकृत वेबसाईटवर (संकेतस्थळावर) कोणत्याही प्रकारच्या राजकीय नेत्यांची छायाचित्रे असल्यास, सदरची छायाचित्रे त्वरीत काढून टाकण्याची कार्यवाही करावी.

(5) विकास/बांधकाम क्षेत्रातील गतीविधी आचारसंहितेच्या उल्लंघनासंदर्भातील तक्रारींच्या अनुषंगाने कोणत्याही तक्रारी प्रमाणित करण्यासाठी निवडणूक जाहिर झाल्यापासून ७२ तासामध्ये खालील माहिती प्राप्त करुन घेण्यात यावीत.

(अ) प्रत्यक्ष कामाची सुरुवात झालेल्या कामांची यादी.

(ब) प्रत्यक्ष कामाची सुरुवात न झालेल्या कामांची यादी.

(6) निवडणूक खर्च देखरेख आणि आदर्श आचारसंहितेचे अंमलबजावणी याबाबतची कार्यवाही – दारु/ रोकड/प्रतिबंधीत औषधे यांच्या वाहतुक तपासणीकरीता भरारी पथके, स्थायी देखरेख पथके तसेच अवैध औषधे/अंमली पदार्थांच्या अवैद्य वाहतुक तपासणीकरीता राज्य उत्पादन शुल्क विभागांतर्गत भरारी पथके तात्काळ कार्यान्वित करण्यात यावीत.

(7) तक्रार देखरेख यंत्रणा निवडणूका जाहिर झाल्यापासून २४ तासाच्या आत तक्रार यंत्रणा कार्यान्वित करण्यात यावीत.

(8) IT Applications निवडणूका जाहिर होताक्षणी अधिकृत संकेतस्थळांवरील ।T Applications आणि सोशल मिडिया तात्काळ कार्यान्वित करण्यात यावेत.

(9) मतदार व राजकीय पक्षांच्या जनजागृतीसाठी माहितीचे प्रसारण करणे निवडणूक विषयक प्रमुख घडामोडींच्या जाहिराती करण्यात याव्यात. रेडिओ, टिव्ही, दुरचित्रवाणी, सिनेमागृहे, शासकीय वाहिन्या यांच्यावरुन मतदार शिक्षण सामुग्रीचे प्रसारण करण्यात यावे.

(10) शैक्षणिक व खाजगी संस्थाकडून सक्रीय सहकार्य निवडणूक विषयक माहिती सर्व सामान्य नागरिक व सर्व संबंधीतापर्यंत पोहचविण्यासाठी शैक्षणिक व खाजगी संस्थाकडून सक्रीय सहकार्य घेण्यात यावे.

(11) माध्यम केंद्र मतदार, राजकीय पक्ष व सर्व संबंधितामध्ये EVM/VVPAT सह निवडणूक यंत्रणेबाबत जागृती निर्माण करण्यासाठी माध्यम केंद्राचा (Media Centre) उपयोग करण्यात यावा.

(12) MCMC/DEMC – राजकीय जाहिरातींचे प्रसारणपूर्व प्रमाणिकरण करण्यासाठी राजकीय पक्षांनी माध्यम प्रमाणिकरण व संनियत्रण समितीकडे संपर्क करावा. त्यानुषंगाने आयोगाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करण्यात यावे.

(13) मुख्य नियंत्रण कक्ष निवडणूक निर्णय अधिकारी तथा 66- आमगाव (अ.ज.) विधानसभा मतदार संघ स्तरावर २४ X ७ नियंत्रण कक्ष तात्काळ स्थापन करण्यात आला आहे व त्यासाठी पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ आणि अन्य साहित्य उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तसेच तहसिल स्तरावर निवासी नायब तहसिलदार यांचे स्तरावर कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. आचारसंहिता कक्ष प्रमुख गटविकास अधिकारी असुन दैनंदिन आचारसंहितेबाबत अहवाल वरीष्ठ कार्यालयात सादर त्यांचेमार्फत करण्यात येत आहे.

(14) सर्व राजकीय पक्षांनी मतदान केंद्रावर बूथ लेवल असिस्टंट ची नियुक्त केल्याबाबत ची माहिती दोन दिवसांमध्ये या कार्यालयाकडे सादर करण्याबाबत आव्हानित करण्यात आले तसेच ग्रुप च्या मदतीने जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करून आपल्या मतदारसंघाची मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी आपल्या स्तरावरून सक्रियपणे मतदान प्रक्रिया, प्रचार व प्रसिद्धीच्या कामांमध्ये सहभाग नोंदवा असे सुचित करण्यात आले.

आदर्श आचारसंहिते संदर्भात आपल्या भागामधील काही घटना झाल्यास तात्काळ मुख्य नियंत्रण कक्षाशी संपर्क करून निवडणूक कामात सहकार्य करणेबाबत आव्हान करण्यात आले.

सदर बैठकीचे प्रास्ताविक हे महेंन्द्र गणविर सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार देवरी यांनी केले. आणि बैठक संपन्न झालेबाबत आभार मोनिका कांबळे सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार आमगाव यांनी मानले.

Share