शिवनेरी बसमध्ये शिवनेरी सुंदरी नेमणार : एसटी महामंडळाचा निर्णय

पुणे : विमान प्रवासादरम्यान आदरातिथ्य व्यवस्थापनाची सेवा देणाऱ्या एअर होस्टेज असतात. आता अशाच हवाई सुंदरी ई-शिवनेरी बसमध्ये देखील दिसणार आहे. एसटी महामंडळातर्फे चालवण्यात येणाऱ्या ई-शिवनेरी बसमध्ये परिचारिका (शिवनेरी सुंदरी) नेमण्यास मान्यता देण्यात आली आहे.मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या ई-शिवनेरी बसमध्ये शिवनेरी सुंदरीची नेमणूक करण्यात येणार आहे. एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी महामंडळाच्या ३०४ व्या बैठकीत ही घोषणा केली. या बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर,‍ परिवहन आयुक्त विवेक भीमनवार व एसटी महामंडचे सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.

महाराष्ट्र ठरले देशातील पहिलेच राज्य –
एसटी महामंडळाचे नवे अध्यक्ष भरत गोगावलेंच्या अध्यक्षतेखाली ३०४ वी संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये विविध खात्याच्या तब्बल ७० पेक्षा जास्त विषयांवर चर्चा होऊन त्यांना मान्यता देण्यात आली. यातच मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या ई-शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी परिचारिका नेमण्यास मान्यता देण्यात आली. असा उपक्रम सुरु करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य आहे.

बस तिकीटात वाढ नाही –
विशेष म्हणजे, शिवनेरी सुंदरीची नेमणूक केल्यानंतरही शिवनेरीच्या बस तिकीटात कोणतीही वाढ करण्यात येणार नाही. दरम्यान, बैठकीत नवीन २ हजार ५०० साध्या बसेस खरेदी करण्याची निविदा तसेच १०० डिझेल बसेसचे प्रायोगिक तत्त्वावरील इलेक्ट्रिक बसमध्ये रूपांतरीत करण्याचा विषयांना मान्यता देण्यात आली आहे.

तसेच एस.टी. महामंडळाच्या प्रत्येक बस स्थानकांवर महिला बचत गटांना स्थानिक पदार्थ विक्री करण्यासाठी चक्रीय पद्धतीने नाममात्र भाडे आकारुन १०X१० आकाराचा स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Share