देवरीच्या एमआयडीसीत बेरोजगारांची थट्टा, खासदार, आमदारांचे बेरोजगारांना लॉलीपॉप .!
देवरी: दुर्गम आणि नक्षलग्रस्त देवरी तालुक्यात ५४ ग्रामपंचायत असून शेकडो गावांचा समावेश आहे. तालुक्याची ओळख ही आदिवासी बहुलतालुका म्हणून आहे. त्या दृष्टीने आजपर्यंत तालुक्यातील युवक व युवतींसाठी रोजगाराची तीळमात्र उपाययोजना लोकप्रतिनिधी किंवा प्रशासनाकडून करण्यात आली नाही ही शोकांकिता आहे. तर देवरी शहरात असलेली एमआयडीसी उद्योगांविना असल्याने बेरोजगार युवकांची थट्टा केल्यासारखाच हा प्रकार असल्याचा आरोप होत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून लोकप्रतिनिधी निव्वळ निवडणुकीच्यावेळी तालुक्यासाठी हे करू, ते करू असे पोकळ आश्वासने देऊन आपला पाणगा शिजवून निघून गेल्याचा इतिहास आहे. पण आजपर्यंत कुठल्याच लोकप्रतिनिधींनी तालुक्यासाठी व तालुक्यातील युवक-युवतींसाठी रोजगारासंदर्भात कंपनी किंवा उद्योगाची साधने तालुक्यात उपलब्ध करणे गरजेचे समजले नाही. काही कंपन्या असल्यातरी पर राज्यातीलच लोकांना येथे प्राधान्य दिले गेले असल्याची शोकांतिका आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग आहे आणि गेल्या दोन वर्षापासून अतिवृष्टी, पूर यामुळे शेतकरी मेटीकुटीस आला आहे. सुशिक्षित बेरोजगार मुले प्रत्येक गावात रोजगारासाठी भटकंती करताना दिसत आहे. पण त्यांना रोजगार तालुक्यात उपलब्ध नसल्याने दिवसेंदिवस बेरोजगारांची संख्या देवरी तालुक्यात झपाट्याने वाढताना दिसत आहे. मात्र या कडे कोणत्याही नेते किंवा पुढार्यांचे लक्ष वेधले नाही. त्यामुळे तालुक्यांतील युवकवर्ग लोकप्रतिनिधी व प्रशासना संदर्भात तीव्र नाराजी व्यक्त करताना दिसत आहे.
◼️लोकप्रतिनिधींनी साधली चुप्पी, लोकप्रतिनिधीचा इंटरेस्ट फक्त मलाईदार कामांकडे-
देवरी तालुक्यामध्ये मागील अनेक वर्षांपूर्वी एमआयडीसी स्थापन झाली आहे. एमआयडीसी झाल्यानंतर येथील युवकांना व्यवसायासाठी एक हक्काचे ठिकाण मिळेल, अशी आशा होती. परंतु, बेरोजगार युवकांना वाकुल्या दाखवण्याचे कार्य येथे सुरू आहे. देवरी तालुक्यात अनेक उद्योग आणून बेरोजगारांना रोजगार देण्याबाबत कुणीही बोलायला तयार नाहीत. खासदार व आमदारसारख्या जबाबदार लोकप्रतिनिधीनीही बेरोजगारांच्या समस्यांबाबत संवेदनशील दिसून येत नाही. मग या एमआयडीसीचे औचित्य तरी काय? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे