सावधान खबरदारी घ्या; जिल्ह्यात हिवताप, डेंग्यू पसरतोय

87 जणांना डेंग्यूची तर 305 जणांना हिवतापाची बाधा

गोंदिया: आरोग्य विभागाकडून प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यात जानेवारी ते जुले या काळात हिवतापाचे 305 तर डेंग्यूचे 87 रुग्ण आढळल्याची नोंद आहे. उल्लेखनिय म्हणजे जुलै महिन्यातच हिवतापाचे 178 व डेंग्यूचे 19 रुग्ण आढळले. वातावरणातील उकाळाही कमालीने वाढला आहे. वेळीच खबरदारी व उपाय योजना न केल्यास आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पावसाळा त्यातच उकाळा ही स्थिती विविध आजार पसरण्यास पोषक मानली जाते. सध्या जिल्ह्यात विविध किटकजन्य, जलजन्य आजारांनी डोके वर काढले आहे. शासकीय, खाजगी रुग्णालयांमध्ये दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढती आहे. वेळीच खबरदारी, योग्य निदान व उपचार न झाल्यास रुग्णांना प्राणही गमवावे लागते. गतवर्षी जिल्ह्यात हिवतापाने दोघांना प्राणास मुकावे लागले आहे. हिवतापानंतर आता डेंग्यूही पसरत आहे. गत सात महिन्यांत जिल्ह्यात 87 डेंग्यू रुग्णांची नोंद झाली आहे. शहरातही डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. हिवतापाचे प्रमाण जास्त असून जानेवारी ते जुलै या काळात 305 रुग्णांचे निदान झाले आहे. सुदैवाने यात कुणचाही जीव गेलेला नाही.

सालेकस्यात सर्वाधिक रुग्ण: सालेकसा तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. तर गोंदिया तालुक्यात डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण आढळलेत. गोंदिया तालुक्यात डेंग्यूचे 21 रुग्ण आढळले पैकी 3 रुग्ण गोंदिया शहरातील आहेत. सालेकसा तालुक्यात हिवतापाचे 94 तर डेंग्यूचे 10 रुग्ण आढळून आले आहेत.

Share