जिल्हातील 23 महसूल मंडळात पावसाने सरासरी ओलांडली

गोंदिया◾️जुलै महिन्याच्या मध्यान्हात सुरू झालेल्या पावसाने जिल्हावासीयांना सळो की पळो करून ठेवले असताना 30 व 32 जलुै रोजी पावसाने उसंत घेतली. मात्र ऑगस्ट लागताच पुन्हा रिपरिप सुरू झाल्याने सखल भागातील धान पीक पाण्याखाली आले आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील 41 महसूल मंडळांपैकी 23 मंडळात पावसाने सरासरी ओलांडली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत 119.4 टक्के पाऊस झाला आहे.

पावसाने जिल्हाभर हजेरी लावल्याने काहींची धान रोवणी खोळंबली आहे. पावसाने उघड दिली नाही तर ओल्या दुष्काळाची झळ शेतकर्‍यांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.  आतापर्यंत 773.7 मिमी म्हणजेच सरासरीच्या 119.4 टक्के पाऊस झाला. जिल्ह्यातील 41 महसूल मंडळांपैकी 23 मंडळात 100 टक्के पाऊस झाला आहे. गोंदिया तालुक्यातील 8 मंडळांपैकी रावणवाडी, कामठा, खमारी, कुडवा मंडळात 100 टक्केपेक्षा अधिक पाऊस झाला.

आमगाव तालुक्यातील चारही मंडळात 90 टक्केपेक्षा कमी पाऊस आहे. तिरोडा तालुक्याच्या 5 मंडळांपैकी मुंडीकोटा, ठाणेगाव, तिरोडा मंडळात 100 टक्केपेक्षा अधिक पाऊस आहे. गोरेगाव तालुक्याच्या चारही मंडळात 100 टक्केपेक्षा अधिक पाऊस आहे. सालेकसा तालुक्यात कावराबांध मंडळ वगळता तिनही मंडळात 100 टक्केपेक्षा कमी पाऊस आहे. देवरी तालुक्यातील मुल्ला मंडळ वगळता चारही मंडळात 100 टक्के पेक्षा अधिक पाऊस आहे. उल्लेखनीय म्हणजे चिचगड मंडळात 207 टक्के व ककोडी मंडळात 152 टक्के पाऊस झाला. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सर्व 6 मंडळात 100 टक्के पाऊस झाला असून महागाव, केशोरी, गोठणगाव मंडळात 150 टक्केपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.

सडक अर्जुनी तालुक्यात सडक अर्जुनी मंडळ वगळता इतर चारही मंडळात 100 टक्केपेक्षा कमी पाऊस आहे. पुजारीटोला धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने धरण सुस्थितीत व नियंत्रणासाठी 10 वक्रदारे 0.30 मीटरने उघडण्यात आली असून 7415 क्युसेक प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कालीसराड धरणाची 2 वक्रद्वार 0.30 मीटरने उघडण्यात आली असून 1797 क्युसेक पाण्याचा प्रति सेकंद विसर्ग सुरू आहे. नदी काठावरील नागरिकांनी सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. सततच्या पावसामुळे सर्वच प्रकल्पांच्या साठ्यात कमालीने वाढ झाली आहे. अनेक मोठी, मध्यम, लघू व मामा तलाव शंभर टक्के भरली आहेत.

Share