नागपूर विभागातील 4 मोठे 24 मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो

गोंदिया ◾️काही दिवसापासून नागपूर विभागासह जवळील मध्यप्रदेशात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नागपूर विभागातील धरणांच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे.  4 मोठे व 24 मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरून ओसंडून वाहत आहेत. नागपूर विभागात 19 मोठे व 43 मध्यम, लघू व मामा तलाव 179 असे एकूण 373 तलाव आहेत. यापैकी बहुतांश तलाव ओसंडून वाहू लागले आहेत. नागपूर विभागात एकूण 43 मध्यम प्रकल्प आहेत. यापैकी सध्या 24 प्रकल्प पूर्ण भरले आहेत. 

मोठे 19 प्रकल्पांपैकी गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह, नागपूर जिल्ह्यातील कामठी खैरी, चंद्रपूर जिल्ह्यातील आसलमेंडा आणि गडचिरोली जिल्ह्यातील दिना हे  चार प्रकल्प 100 टक्के भरले आहेत. तोतलाडोह 90.92 टक्के, रामटेक 89.97 टक्के, वणा 92.86 टक्के, पुजारीटोला 71 टक्के, कालीसराड 72 टक्के भरली आहेत. ही धरणे सुस्थितीत राहण्याकरिता जिल्हा पूर नियंत्रण विभागाने पुजारीटोला धरणाची 10 दारे 0.30 मीटरने उघडली असून यातून प्रति सेकंड 7415 क्युसेक पाण्याच्या विसर्ग सुरू आहे. कालीसराड धरणाचे दोन दार 0.30 मीटरने उघडण्यात आली असून यातून 1797 क्युसेक प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील दिवसापासून संततधार सुरू असल्याने इतरही तलावातील जलसाठ्यात दैनिक लक्षणीय वाढ होत आहे. त्यामुळे येत्या काळात शेतीला सिंचन व पिण्याच्या पाण्याच्या समस्याचे निवारण होणार आहे.

Share