नवेगावबांध येथे 60 जणांना अतिसाराची लागण

अर्जुनी मोरगाव ◾️ तालुक्यातील नवेगावबांध येथे पाणीपुरवठा योजनेद्वारे झालेल्या दूषित पाणी पुरवठ्यामुळे 50 ते 60 गावकर्‍यांना अतिसाराची लागण झाल्याचे बुधवार, 31 जुलै रोजी सायंकाळी उघडकीस आले. 15 ते 16 रुग्णांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर संभाव्य धोका लक्षात घेता नवेगावबांध येथील पाणीपुरवठा आज, 1 ऑगस्टपासून बंद ठेवण्याचे निर्देश तालुका वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिले आहेत.

नवेगावबांध येथील इंदिरानगर व आखर मोहल्ला प्रभाग क्र. 3 व 4 येथील 50 ते 60 नागरिकांना अतिसाराची लागण झाल्याची बाब बुधवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. वैद्यकीय तपासणीनंतर अंदाजे 50-60 व्यक्तींना अतिसाराची लागण झाली आहे. ज्यांना अतिसाराची लागण झाली आहे, त्यांना रुग्णालयात दाखल होण्याच्या सूचना आरोग्य विभागाने केल्या. परंतु बाधित व्यक्ती विविध कारणे देत रुग्णालयात दाखल होण्यास नकार देत असल्याचे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश लोथे यांनी सांगितले. दूषित पाणीपुरवठ्यामुळे हा प्रकार घडल्याची शक्यता लक्षात घेऊन गुरुवारपासून गावातील नळयोजनेद्वारा होणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे निर्देश आरोग्य विभागाने संबंधित विभागाला दिले आहे. diarrhea in Navegaonbandh अर्जुनी मोरगावचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दखणे व आरोग्य विभागाचे कर्मचार्‍यांनी ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांना याबाबत माहिती दिली. बुधवारी सामुदायिक आरोग्य अधिकारी डॉ. युगा कापगते व डॉ. शुभांगी बोरकर यांनी ग्रामपंचायतमध्ये आयोजित बैठकीतही याबाबतची माहिती दिली. यानंतर आरोग्य विभागाने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.

गावातील जलाशयातून नळाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. सध्या मुसळधार पाऊस व पूर आल्यामुळे जलाशयातील पाणी गढूळ झाले आहे. हे पाणी पिण्यायोग्य नाही, असा निर्वाळा आरोग्य विभागाने दिला आहे. यातूनच गावकर्‍यांना अतिसाराची लागण झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे. तर काही दिवस नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येऊ नये अशा सूचना आरोग्य विभागामार्फत देण्यात आले आहेत.

Share