दोन लाख विद्यार्थी सीसीटीव्हीच्या कक्षेत परंतु धोकादायक इमारती आणि स्वच्छालयाच काय ?
गोंदिया◼️ विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण चांगले मिळाले तर त्याचा पुढील शिक्षणाचा स्तर उंचावतो. त्यासाठी शिक्षण हक्क कायदा अमलात आणण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांच्या दृष्टीने प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही कॅमेरा बसविणे गरजेचे आहे. असे असताना जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 1 हजार 664 शाळांपैकी 131 शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. परंतु ग्रामीण दुर्गम भागातील शाळेच्या धोकादायक वर्ग खोल्या आणि स्वच्छतागृह आणि पिण्याच्या पाण्याच्या सुविधा आजही निरुत्तरीत आहेत.
शाळांमध्ये अलीकडच्या काळामध्ये विद्यार्थिनींशी छेड काढणे, शाळाबाह्य व असामाजिक तत्वांचा वावर तसेच चोरीच्या घटना वाढत आहेत. यासह विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा व परिसरात सीसीटीव्ही कॅमेराची गरज निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील 131 शाळा सीसीटीव्हीच्या निगरानीखाली आल्या आहेत. त्यात अर्जुनी मोरगाव तालुक्यातील 212 पैकी 15 शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून 197 शाळांमध्ये ही सोय नाही. आमगाव तालुक्यातील 154 पैकी 7 शाळांत कमेरा असून 142 शाळांत कॅमेरा नाहीत. देवरी तालुक्यातील 208 शाळांपैकी 8 शाळेत कॅमेरा असून 200 शाळांमध्ये कॅमेरा नाहीत. गोंदिया तालुक्यातील 417 शाळांपैकी 72 शाळेत कॅमेरे असून 545 शाळांमध्ये ही सोय नाही.
गोरेगाव तालुक्यातील 158 शाळांपैकी 4 शाळोत कॅमेरे असून 154 शाळांमध्ये कॅमेरे नाहीत. सालेकसा तालुक्यातील 143 शाळांपैकी 10 शाळांत कॅमेरा असून 133 शाळांत नाहीत, सडक अर्जुनी तालुक्यातील 171 शाळांपैकी 8 शाळांत कॅमेरा असून 163 शाळांत नाही तर तिरोडा तालुक्यातील 202 शाळांपैकी 8 शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असून 194 शाळांमध्ये नाही. त्यामुळे आजघडीला जिल्ह्यातील 131 शाळांमधील 2 लाख विद्यार्थी सीसीटीव्ही कॅमेरेच्या कक्षेत असून 1,533 शाळांना अद्यापही सीसीटीव्ही कॅमेराची प्रतिक्षा आहे.
या सोबतच प्रशासनाने भौतिक सुविधा, वर्ग खोल्या, बंद पडलेल्या डिजिटल शाळा, स्वच्छालय याकडे विशेष लक्ष देण्याची मागणी जनतेने केली आहे.