सातगावच्या पतसंस्थेत 58 लाखांची अफरातफर, सालेकसा पोलिसांनी गुन्हा दाखल

सालेकसा◼️  तालुक्यातील सातगाव (भजेपार) येथील आदर्श महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत तब्बल 58 लाख 90 हजार 456 रुपयांची अफरातफर झाल्याचा प्रकार वित्तीय वर्ष 2015 ते 2020 कालावधीत घडल्याचे लेखा परिक्षणातून उडकीस आला आहे. या प्रकरणी पतसंस्थेचा मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश रामप्रसाद खोब्रागडे (54), अध्यक्षा रामकला चंभरू शिवणकर (54) दोन्ही रा. भजेपार, ता. सालेकसा, व्यवस्थापक अतुल प्रल्हाद बळगे (34) रा. तिरखेडी, ता. सालेकसा अशी गुन्हा नोंद करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पतसंस्थेच्या रोकड वहीत खोडतोड करून अपहार करण्यात आलेली रक्कम 23 लाख 9 हजार 768 रुपये, 31 मार्च 2020 अखेर ताळेबंदाप्रमाणे असलेली अखेर रोख शिल्लक संस्थेत उपलब्ध नसलेली अपहारीत रक्कम 9 लाख 25 हजार 181 रुपये, बँक खात्यातून विड्रॉल केलेल्या धनादेशाद्वारे पेमेंट केलेल्या रकमेची संस्थेच्या कॅशबुकात दैनंदिन रोकड वहीत नोंद न घेता अपहार करण्यात आलेली रक्कम 2 लाख 30 हजार 30 रुपये, 31 मार्च 2019 अखेर ताळेबंद पत्रकानुसार उसणवार घेणे रकमेच्या वसुलीची नोंद रोकड वहीत न करता अपहार करण्यात आलेली रक्कम 3 लाख 60 हजार रुपये, जमा पावती, जमा व्हाउचरनुसार जमा झालेल्या रकमांची कॅशबूक/ दैनिक रोकड वहीत नोंद न घेता अपहार केलेली रक्कम 54 हजार 400 रुपये, दैनिक रोकड वहीत नोंद न घेता परस्पर खतावणीला रकमा जमा दर्शवून अपहार केलेली रक्कम 24 हजार 483 रुपये, दैनिक ठेव अभिकर्ता यांच्याकडून जमा झालेल्या रकमांची कॅशबूक, दैनिक रोकड वहीत कमी  नोंद करून अपहार केलेली रक्कम 27 हजार 610 रुपये, संस्था अध्यक्ष यांच्याकडील तारण कर्ज वसुल न करता मुदत ठेवीची रक्कम परत करून अपहार केलेली रक्कम 1 लाख 25 हजार रुपये, दैनिक रोकड वहीत 11 ऑगस्ट 2016 रोजी एकूण जमा रक्कम कमी दाखवून अपहार केलेली रक्कम 10 हजार रुपये, ठेवीदारांची एकूण जमा झालेली मुदतठेव रक्कम रोकड वहीत जमा न घेता अपहार केलेली रक्कम 29 हजार 500 रुपये, ताळेबंद पत्रकात इतर घेणे दर्शवून केलेल्या अपहाराची रक्कम सहा लाख 29 हजार 857 रुपये, ताळेबंद पत्रकात अभिकर्ता घेणे दर्शवून अपहार केलेली रक्कम 9 लाख 21 हजार 627 रुपये असे 58 लाख 90 हजार 456 रुपयांची अफरातफर पतसंस्थेत झाल्याचे उघड झाले आहे. जिल्हा विशेष लेखा परीक्षक वर्ग-1, सहकारी संस्था नागपूर येथील उपलेखा परीक्षक विजय मोटघरे यांनी सादर केलेला फेर लेखा परीक्षण अहवाल, चौकशी अहवालावरून सालेकसा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Print Friendly, PDF & Email
Share