दोन हजारांची लाच, तलाठी एसीबीच्या जाळ्यात
भंडारा : शेतीची रजिस्ट्री केल्यानंतर फेरफार करण्याकरीता शेतकर्याकडून दोन हजारांची लाच मागणार्या नेरला येथील तलाठी रविंद्र पडोळे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच रक्कम स्विकारताना रंगेहात अटक करण्यात आली. काही दिवसाअगोदर रोहा येथील तलाठ्याला सापळा कारवाईदरम्यान ताब्यात घेण्यात आले होते. या प्रकारामुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
तक्रारदाराने दि.७ मे २०२४ रोजी शेती खरेदी करून पवनी येथे शेतीची रजिस्ट्री केली होती. खरेदी केलेल्या शेतीचे फेरफार करण्याकरीता अड्याळ जवळील नेरला येथील तलाठी रविंद्र पडोळे यांची भेट घेऊन कागदपत्रे देण्यात आले. तलाठी रविंद्र पडोळे यांनी दि.११ मे रोजी तक्रारदाराला फोन करून दोन हजार रूपये लाचेची मागणी केली. तक्रारदाराने यासंबंधीची तक्रार दि.१४ मे रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग भंडारा येथे देण्यात आली. तक्रारीवरून पडताळणी करण्यात आली. पडताळणी दरम्यान तलाठ्यांनी २ हजारांची मागणी करून तडजोडअंती एक हजार रूपये स्विकारण्याची तयारी दर्शविली. दि.१५ मे रोजी सापळा कारवाई दरम्यान नेरला येथील तलाठी रविंद्र पडोळे यांना एक हजार रूपयांची लाच रक्कम स्विकारताना अटक करण्यात आली. लाचखोर तलाठ्याविरूद्ध भंडारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.