दिग्गजांना पराभवाची धूळ चाखणारा मतदार संघ भंडारा-गोंदिया

गोंदिया: स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सन 1952 सालच्या निवडणुकीपासून भंडारा-गोंदिया मतदारसंघ अस्तित्वात आला. या मतदार संघातून विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अशोक मेहता, डॉ. श्रीकांत जिचकार, प्रफुल्ल पटेल या दिग्गजांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

या मतदार संघावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. असे असताना येथील मतदारांनी काँग्रेस, राष्ट्रवादीला दणका देत पाचदा भाजपाला संधी दिली. आज हा मतदारसंघ भाजपाचा गड मानला जातो. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उदयानंतर येथे राष्ट्रीय काँग्रेसचे पाणीपत झाले. 13 वेळा काँग्रेस व राष्ट्रवादीचे खासदार राहिले. सन 1977 मध्ये लक्ष्मणराव मानकर यांनी जनता पार्टीतर्फे येथून प्रतिनिधीत्व केले आहे. रामचंद्र हाजरणवीस, केशोराव पारधी यांनी दोन वेळा, प्रफुल्ल पटेलांनी चार वेळा येथील प्रतिनिधीत्व केले. 1989 मध्ये डॉ. खुशाल बोपचे, 1999 मध्ये चुन्नीलाल ठाकूर, 2004 मध्ये शिशुपाल पटले व 2014 मध्ये नाना पटोले व 2019 मध्ये सुनिल मेंढे भाजपाच्या तिकिटावर निवडून आले.

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात तिरोडा, अर्जुनी मोर, गोंदिया, भंडारा, साकोली, तुमसर या विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. मतदार संघाच्या पुनर्रचनेपूर्वी देवरी-आमगाव विधानसभा क्षेत्राचा याच मतदार संघात समावेश होता. 2009 च्या पुनर्रचनेत देवरी-आमगाव मतदारसंघ गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात जोडण्यात आला. या मतदार संघात जातीय समीकरणाचा पगडा राहिला आहे. सर्वाधिक मतदार कुणबी, तेली, पोवार समाजाचे आहेत. या समाजाची मते ज्या उमेदवाराकडे झूकली त्याच उमेदवाराचे भाग्य उजाळते, असा समज आहे. म्हणूनच राजकीय पक्ष उमेदवारी देताना जातीगत समिकरणे आखूनच उमेदवारी देत असल्याचाही इतिहास आहे. आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये या मतदार संघातून महिला उमेदवारीला सर्वच राजकीय पक्षांनी दूर ठेवल्याचे दिसते, 2019 चा अपवाद वगळता बहुजन समाज पक्षाने दिलेली एकमात्र उमेदवारी आहे.

Print Friendly, PDF & Email
Share